कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविण्याची कामगिरी म्हणजे सांघिक यशाचा वस्तूपाठच होय. 2023 च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत सलग 10 सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव जिव्हारी लागलेल्या भारतीय संघाने 2024 च्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर यंदाच्या चॅम्पियन ट्रॉफीवरही कोरलेले नाव खेळाडूंच्या जिद्दीचेच दर्शन घडवते. या यशाचे वैशिष्ट्या म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कपप्रमाणे या स्पर्धेतदेखील भारताने एकही सामना गमावला नाही. सर्व सामने दुबईत खेळल्याने भारतीयांना प्रवास करावा लागला नाही. त्यामुळेच या संघाला विजेतेपद मिळवता आल्याचे विश्लेषण पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह काही खेळाडूंनी केले आहे. तथापि, हे विश्लेषण एकांगीच ठरते. एकाच जागी खेळल्याचा भारतीय संघाला फायदा झाला, यात दुमत नाही. परंतु, त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीचे मोल कमी होत नाही. अगदी पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत प्रत्येक खेळाडूने काही ना काही योगदान दिल्यानेच भारतीय संघ चॅम्पियन ठरला, हे लक्षात घेतले पाहिजे. कर्णधार रोहित शर्मा याने कर्णधार आणि सलामीवीर या दोन्ही भूमिका नेटाने निभावल्या. अंतिम सामना वगळता अन्य सामन्यांमध्ये रोहितला भले मोठी धावसंख्या उभारता आली नसेल. पण, सुऊवातीच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या त्याच्या निसर्गदत्त स्वभावामुळे प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आला, हे नक्की. अंतिम सामन्यातील त्याच्या 76 धावा म्हणजे राखून ठेवलेली खेळीच म्हणता येईल. कर्णधार म्हणूनही तो सर्व स्तरावर वरचढ ठरला. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड हे दोन्ही तुल्यबळ संघ. एकेकाळी अशा संघांशी झुंजताना मानसिक पातळीवर आपण कमी पडायचो. तथापि, गुणवत्ता, रणनीती, देहबोली अशा सगळ्याच बाबतीत आपण या दोन्ही संघांपेक्षा सरस आहोत, हे भारताने दाखवून दिले, ते रोहितच्या नेतृत्व कौशल्यातून. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संघातील प्रत्येक खेळाडू आपली जबाबदारी समजून खेळतो आहे. शुभमन गिलची कामगिरीही उल्लेखनीय, एक शतक व अर्धशतक झळकवणाऱ्या शुभमनने अन्य सामन्यातही उपयुक्त खेळ्या केल्याचे दिसते. स्टार फलंदाज विराट कोहलीने एका शतक, अर्धशतकासह क्लास काय असतो, हे दाखवून दिले. श्रेयस अय्यरचे कौतुक करावे तेवढे कमीच. मधल्या काळात उसळत्या चेंडूने श्रेयसला इतके जेरीस आणले, की त्याची कारकीर्द धोक्यात आली होती. मात्र, स्थानिक स्पर्धांमध्ये या पठ्ठ्याने मेहनत घेतली आणि त्याचे फळ त्याला मिळाले. चॅम्पियन स्पर्धेत भारताकडून त्याने सर्वाधिक 243 धावा ठोकल्या. जवळपास प्रत्येक सामन्यात श्रेयसची बॅट तळपली. हे बघता भारताच्या विजयाचे मुख्य श्रेय त्याला दिल्यास ते चुकीचे ठरणार नाही. अक्षर पटेल याचा अष्टपैलू म्हणून झालेला उदय देशासाठी सुखावणाराच ठरावा. पाचव्या क्रमांकावर येऊन त्याने या स्पर्धेत ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याला तोड नाही. त्याने मारलेले काही फटके तो किती चांगला फलंदाज आहे, हे दाखवून दिलेले आहे. मला कमी समजू नका असाच जणू इशारा त्याचा आहे. याशिवाय गोलंदाज म्हणूनही तो अनेकदा उपयुक्त ठरला. भविष्यातही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा असेल. के. एल. राहुलची या स्पर्धेतील कामगिरी पाहिल्यानंतर राहुल द्रविडची आठवण आल्याशिवाय राहत नाही. फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्ही पातळ्यांवर त्याने दाखवलेली चिकाटी कौतुकास्पद होय. एक चांगला फिनिशर कसा असतो, हेच राहुलने सिद्ध केले. हे बघता पंतऐवजी त्याची झालेली निवड योग्यच ठरावी. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या याने आपले महत्त्व यापूर्वीच दाखवून दिले आहे. या स्पर्धेतही फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्याने जबरदस्त प्रदर्शन केले. जगातील महत्त्वाच्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद शमीसारख्या बॉलरला त्याने दिलेली साथ तितकीच महत्त्वाची. रवींद्र जडेजा हा भारताचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू. परंतु, या खेपेला जडेजाला फलंदाजीमध्ये फारसा वाव मिळाला नाही. किंबहुना, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात त्याने आपले योगदान दिले. कुलदीप यादवनेही आपल्या फिरकीने भल्याभल्यांना चकवले. विशेषत: अंतिम सामन्यातील त्याने जो स्पेल टाकला, तो अविस्मरणीयच म्हणता येईल. फॉर्मात असलेल्या राचिन रवींद्रबरोबरच भरवश्याच्या विल्यमसनला त्याने माघारी धाडल्यानेच भारताचा विजय सुकर झाला, हे ध्यानात घेतले पाहिजे. फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्तीच्या समावेशामुळे बरेच वादळ उठले होते. त्यावरून प्रशिक्षक गौतम गंभीरवर वशिलेबाजीचाही आरोप झाला होता. परंतु, हे वऊणास्त्र किती प्रभावी आहे, हे दुबईत दिसून आले. वरूणने ज्या पद्धतीने अनेक फलंदाजांना नाचवले, ते पाहता आगामी काळातही त्याच्याकडून अपेक्षा असतील. या स्पर्धेत दुखापतीमुळे जसप्रित बुमराहचा समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे भारताची सगळी मदार ही मोहम्मद शमीवर होती. शमीनेही 9 बळी घेत आपला धडाका दाखवून दिला. विश्वकरंडक स्पर्धाही शमीने आपल्या गोलंदाजीने गाजवली होती. या स्पर्धेतही त्याने हाच अंदाज राखला. हे बघता त्याच्यासह सर्व गोलंदाजांनाही या विजयाचे श्रेय द्यायला पाहिजे. कर्णधार रोहित शर्मा याने हे सांघिक यश असल्याची दिलेली प्रतिक्रिया समर्पकच ठरावी. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला, तर केवळ एकट्या दुकट्यावर आपण जिंकलो नाही. टीमवर्कमधूनच आपण येथवर यशस्वी मजल मारू शकलो, हे स्पष्टपणे जाणवते. या जेतेपदापाठोपाठ आयसीसीकडून चॅम्पियन करंडकातील सर्वोत्तम 12 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यात विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, मोहम्मद शमी, वऊण चक्रवर्ती, अक्षर पटेल या सहा खेळाडूंसह भारतीय संघाचेच वर्चस्व दिसून येते. धोनीने संघाला एका वेगळ्या उंचीवर नेले. रोहितने हाच वारसा पुढे नेल्याने भविष्यातही टीम इंडियाकडून मोठ्या आशा असतील.
Previous Articleपंतप्रधान मोदी यांना मॉरीशसचा पुरस्कार
Next Article रेल्वेच्या अपहरणामुळे हादरला पाकिस्तान
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








