वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय क्रिकेट निवड समिती आज शनिवारी येथे नवीन कसोटी कर्णधार निवडून इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या आव्हानात्मक मालिकेसाठी संघ निश्चित करेल. कोहली आणि रोहित यांच्या निवृत्तीनंतर आणि एका आठवड्यात भारत नवीन जागतिक कसोटी स्पर्धेत प्रवेश करणार असून शुभमन गिल हा कर्णधारपदासाठी स्पष्टपणे पसंतीचा खेळाडू आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराह उपकर्णधार होता आणि त्याला नेतृत्वाच्या भूमिकेत बढती मिळायला हवी होती. परंतु त्याच्या तंदुऊस्तीविषयीचे प्रश्न आणि ताण व्यवस्थापनाचा मुद्दा त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. रिषभ पंतने या आयपीएलमध्ये विसरता येण्याजोगा अनुभव घेतला आहे, परंतु तो कसोटीतील भारताच्या संक्रमण टप्प्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. निवड समिती त्याला उपकर्णधार बनवण्याची शक्यता आहे. नेतृत्वाचा प्रश्न सोडला, तर कोणताही मोठा बदल संघात अपेक्षित नाही.
रोहित आणि कोहलीच्या बाहेर पडण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी, के. एल. राहुलसारखे खेळाडू फलंदाजी विभागात अत्यंत आवश्यक अनुभवाची जोड देऊ शकतात. राहुल आणि यशस्वी जैस्वाल 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत सलामीला येण्याची अपेक्षा असली, तरी निवड समितीकडे साई सुदर्शन हा एक उत्तम पर्याय असून त्याला राखीव सलामीवीर म्हणून निवडले जाण्याची शक्यता आहे. कऊण नायर, सर्फराज खान किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला अतिरिक्त फलंदाज म्हणून खेळविले जाते का हे पाहावे लागेल. आणखी एक दिग्गज खेळाडू आर. अश्विनच्या निवृत्तीमुळे रवींद्र जडेजा हा संघातील मुख्य फिरकी गोलंदाज असेल आणि निवड समिती इंग्लंडच्या परिस्थितीचा विचार करता दोन किंवा तीन फिरकी गोलंदाजांसह पुढे जाते का हे पाहणे रंजक ठरेल. जर दोन फिरकी गोलंदाज निवडण्याचे ठरविले, तर वॉशिंग्टन सुंदरला कुलदीप यादवच्या पुढे संधी मिळू शकते. कारण तो सर्व प्रकारांतील सामने जिंकून देऊ शकणारा फलंदाज आहे.









