जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी निवडीची शक्यता
वृत्तसंस्था/ मुंबई
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ पुऊष क्रिकेट संघ निवड समितीची महत्त्वाची बैठक आज सोमवारी दुपारी नवी दिल्लीत होणार आहे. श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी ही बैठक होणार असून यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघाचा नवा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. द्रविड दिल्लीत उपस्थित असतील, तर रोहित मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होण्याची शक्यता आहे. निवड समितीचे आणखी एक सदस्य एस. एस. दास हे या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने सामील होणारे आहेत. ते सध्या भारतीय संघासोबत आयर्लंडमध्ये आहेत.
विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडण्यासाठी आयसीसीची अंतिम मुदत 5 सप्टेंबर अशी आहे. त्यामुळे सध्या निवड समिती केवळ आशिया चषक स्पर्धेसाठी संघ निवडण्याची शक्यता आहे. परंतु हाच संघ विश्वचषकही खेळण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर आगरकर मीडियाशी बोलण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. चेतन शर्माने फेब्रुवारीमध्ये पद सोडल्यानंतर निवड समितीच्या प्रमुखांसमवेत पत्रकार परिषद बीसीसीआयने आयोजित केलेली नाही.
निवड समिती 15 की, 17 सदस्यीय संघ निवडते हेही पाहणे रोचक ठरेल. विश्वचषकाच्या विपरित आशिया चषक स्पर्धेचे नियम 17 सदस्यीय संघ निवडण्यास परवानगी देतात. बांगलादेश आणि पाकिस्तानने 17 सदस्यीय संघ निवडले आहेत, अशी माहिती एका सूत्राने दिली.









