ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय : केएल राहुल, विराट कोहलीची शानदार खेळी :
वृत्तसंस्था/ चेन्नई
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात टीम इंडियाने विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत 199 धावांवर आटोपला. यानंतर भारताने विजयासाठीचे लक्ष्य 41.2 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत शानदार विजय मिळवला. भारताकडून केएल राहुल (नाबाद 97) व विराट कोहली (85) धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली. केएल राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारताला दोन गुण मिळाले आहेत. आता, भारताचा पुढील सामना दि. 11 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध नवी दिल्ली येथे होईल.
चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य होते मात्र, या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा, ईशान किशन व श्रेयस अय्यर हे तिघेही खातेही न खोलता बाद झाले. भारताने तीन षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद पाच धावा केल्या होत्या. या कठीण परिस्थितीत विराट कोहली व केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. विराटने शानदार खेळी साकारताना 116 चेंडूत 6 चौकारासह 85 धावा केल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असताना चुकीच्या फटक्यावर तो झेलबाद झाला. त्याला केएल राहुलने चांगली साथ देताना 115 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह नाबाद 97 धावा फटकावल्या. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचा धावपलक हलता ठेवला. विराट बाद झाल्यानंतर राहुलने हार्दिक पंड्याला सोबतीला घेतल संघाला 41.2 षटकांत विजय मिळवून दिला. हार्दिकने 8 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या.
फिरकी त्रिकुटापुढे कांगारुंचे लोटांगण
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मिचेल मार्श खातेही न उघडता बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार फलंदाजी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. मात्र, चेंडू जुना झाल्यानंतर दोघांनाही धावा काढणे कठीण झाले. वॉर्नरने 52 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. तो कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात 36 धावांची भागीदारी झाली, पण स्मिथ बाद होताच ‘तू चल मैं आया‘च्या धर्तीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज एकामागोमाग बाद झाले. स्मिथने 71 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 46 धावांचे योगदान दिले. लाबुशेन 41 चेंडूत 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अनुभवी ग्लेन मॅक्सवेललाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेल अवघ्या 15 धावांवर कुलदीप यादवचा शिकार ठरला. अॅलेक्स कॅरीला भोपळाही फोडता आला नाही. रविंद्र जडेजाच्या चेंडूवर कॅरी गोल्डन डकचा शिकार ठरला. कॅमरुन ग्रीनला आठ धावांवर अश्विनने तंबूत धाडले.
अखेरीस मिचेल स्टार्कने 35 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 28 धावा करत संघाची धावसंख्या 200 च्या जवळ नेली. जोस हेझलवूड एका धावेवर नाबाद परतला. कर्णधार कमिन्सने 24 चेंडूत 15 धावा फटकावल्या. यामुळे ऑसी संघाला 199 धावापर्यंत मजल मारता आली. भारताकडून रवींद्र जडेजाने 10 षटकांत 28 धावा देत 3 बळी घेतले. कुलदीप यादवने 10 षटकात 42 धावा देत 2 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनला एक विकेट मिळाली. वेगवान गोलंदाज बुमराहने 2 बळी घेतले. हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 49.3 षटकांत सर्वबाद 199 (डेव्हिड वॉर्नर 41, स्टीव्ह स्मिथ 46, लाबुशेन 27, ग्लेन मॅक्सवेल 15, पॅट कमिन्स 15, मिचेल स्टार्क 28, जडेजा 3 बळी, बुमराह व कुलदीप यादव प्रत्येकी दोन बळी)
भारत 41.2 षटकांत 4 बाद 201 (रोहित शर्मा 0, इशान किशन 0, विराट कोहली 116 चेंडूत 6 चौकारासह 85, केएल राहुल 115 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह नाबाद 97, हार्दिक पंड्या नाबाद 11, जोस हेजलवूड 38 धावांत 3 बळी, मिचेल स्टार्क एक बळी).
वॉर्नरने रचला इतिहास, विश्वचषकातील सचिनचा मोडला रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात एक आगळावेगळा पराक्रम आपल्या नावे केला. आज भारताविरुद्धच्या सलामीच्या लढतीत वॉर्नर 41 धावांची खेळी करून तंबूत परतला. मात्र, त्याच्या या खेळीनंतर मोठा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. डेव्हिड वॉर्नर हा वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये वेगाने 1000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने याबाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. डेव्हिड वॉर्नरने 19 वर्ल्डकप इनिंगमध्ये 1 हजार धावांचा आकडा गाठला आहे. तर सचिन तेंडुलकरने 20 डावात ही कामगिरी केली होती. तसेच एबी डिव्हिलियर्सने 20 डावात एक हजार धावा केल्या होत्या.
विश्वचषक स्पर्धेत वेगवान 1000 धावा करणारे फलंदाज (डावानुसार)
19- डेविड वॉर्नर
20- सचिन तेंडुलकर
20- एबी डिविलियर्स
21- विवियन रिचर्ड्स
21 -सौरव गांगुली
क्षेत्ररक्षणातही विराटचा जलवा,
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक झेल घेणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
विराट कोहलीने वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात आगळावेगळा विक्रम नावावर केला आहे. विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीत मिचेल मार्शचा झेल घेत विराटने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट आता वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय फिल्डर झाला आहे. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. विराटने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराटचा हा चौथा विश्वचषक आहे. वर्ल्डकपमधील 27 सामन्यात विराटने 15 झेल घेतले आहेत. यानंतर अनिल कुंबळे यांनी 18 सामन्यात 14 कॅच घेतले आहेत.
वर्ल्डकपमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू –
विराट कोहली – 15 झेल
अनिल कुंबळे – 14 झेल
कपिल देव – 12 झेल
सचिन तेंडुलकर – 12 झेल
विरेंद्र सेहवाग – 11 झेल
रोहित ठरला विश्वचषकातील सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात कर्णधार म्हणून प्रवेश केलेला रोहित शर्मा आता विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार बनला आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीन या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. 8 ऑक्टोबर रोजी रोहित चे वय 36 वर्षे 161 दिवस आहे. त्याच्या आधी 1999च्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हा सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार होता. तेव्हापासून सौरव गांगुली, राहुल द्रविड, एम.एस. धोनी, विराट कोहली हे विश्वचषकात कर्णधार झाले पण ते अझरुद्दीनचा सर्वात जास्त वयाचा विक्रम मोडू शकले नाहीत. या यादीत 24 वर्षांनंतर रोहितने अझरुद्दीनला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले आहे.
विश्वचषकातील सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार-
36 वर्षे 161 दिवस – रोहित शर्मा (2023)
36 वर्षे 124 दिवस- मोहम्मद अझरुद्दीन (1999)
34 वर्ष 71 दिवस – राहुल द्रविड (2007)
34 वर्ष 56 दिवस – श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (1979)
33 वर्ष 262 दिवस – एम.एस. धोनी (2015)









