2 कसोटी, 3 वनडे व 5 टी-20 सामने खेळणार : युवा खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप संपल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या द्रौयावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात भारत व वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, आगामी विंडीज दौऱ्यात अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंना स्थान देण्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
भारताच्या विंडीज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होईल. पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलैदरम्यान डोमिनिकामध्ये खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 20 ते 24 जुलैदरम्यान त्रिनिदादमध्ये आयोजित केला गेला आहे. त्यानंतर 27 जुलैपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेतील पहिला सामना 27 जुलैला खेळला जाईल. मालिकेतील दुसरा सामना 29 जुलै, तर तिसरा सामना 1 ऑगस्ट रोजी आयोजित केला गेला आहे. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने बार्बाडोसमध्ये तर शेवटचा सामना त्रिनिदादमध्ये आयोजित केला गेला आहे. यानंतर उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. टी-20 मालिकेतील पहिले तीन सामने विंडीजमध्ये तर उर्वरित दोन सामने अमेरिकेत खेळवले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली.
भारतीय वेळेनुसार विंडीजविरुद्धचे कसोटी सामने सायंकाळी 7.30 पासून सुरु होतील. वनडे सामने सायं. 7 वाजता, तर टी-20 सामने रात्री 8 वाजता सुरू होतील. दरम्यान विंडीज दौऱ्यासाठी य संघाचे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन युवा खेळाडूंना संधी देऊ शकतात.
भारतीय संघाचा विंडीज दौरा –
12-16 जुलै : पहिली कसोटी, डोमिनिका
20-24 जुलै : दुसरी कसोटी, त्रिनिदाद
27 जुलै : पहिला वनडे सामना, बार्बाडोस
29 जुलै : दुसरा वनडे सामना, बार्बाडोस
1 ऑगस्ट : तिसरा वनडे सामना, त्रिनिदाद
3 ऑगस्ट : पहिला टी-20 सामना, त्रिनिदाद
6 ऑगस्ट : दुसरा टी-20 सामना, गयाना
8 ऑगस्ट : तिसरा टी-20 सामना, गयाना
12 ऑगस्ट : चौथा टी-20 सामना, प्लोरिडा
13 ऑगस्ट : पाचवा टी-20 सामना, फ्लोरिडा









