बांग्लादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत टीम इंडियाने 2-0 ने मिळविलेला मालिका विजय नक्कीच महत्त्वाचा मानला पाहिजे. किंबहुना या माध्यमातून भारतीय संघाच्या काही मर्यादाही उघड झालेल्या दिसतात. हे पाहता पुढच्या टप्प्यात संघाला अधिक नियोजनपूर्वक मैदानात उतरावे लागेल. आजचा जमाना झटपट क्रिकेटचा असला, तरी खरे वा अस्सल क्रिकेट म्हणून कसोटीकडेच पाहिले जाते. ज्यात खेळाडूंचा खऱया अर्थाने कस लागतो, ती कसोटी, असे या प्रकारातील क्रिकेटचे वर्णन करता येईल. कसोटीच्या इतिहासात भारताचा म्हणून एक दर्जा राहिलेला आहे. गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, अजित वाडेकर, सुनील गावसकर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दिन, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग ते विराट कोहली अशा कितीतरी खेळाडूंनी कसोटी क्रिकेट गाजवले आहे. असा समृद्ध वारसा लाभलेला भारत कसोटी क्रिकेटमध्ये टॉप थ्रीमध्ये असणे नक्कीच भूषणावह होय. परंतु, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विचार करता भारतीय संघ परिपूर्ण वाटतो का, असा प्रश्न केल्यास त्याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. कर्णधार रोहित शर्मा याच्या दुखापतीमुळे कसोटीत भारताचे नेतृत्व के. एल. राहुल याच्याकडे सोपविले गेले. परंतु, त्याची एकूणच कामगिरी पाहिली असता त्याला कसोटी संघात स्थान देणे, हा आत्मघात आहे, असे म्हटल्यास ते आता चुकीचे ठरू नये. वन डे, टी-20, कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये राहुलला सातत्याने संधी देण्यात आली आहे. बांग्लादेश कसोटीत तर त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. तथापि, त्याच्याकडून वारंवार सुमार कामगिरीचेच दर्शन घडणार असेल, तर त्याला संघात कुठवर पोसत राहायचे, याचा विचार करावा लागेल. त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणे का नको, असाही सूर अलीकडे क्रिकेट वर्तुळातून आळविला जात आहे. रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमधील खणखणीत द्विशतकानंतर पुन्हा निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. फॉर्मअभावी संघातून डच्चू मिळालेल्या या गुणवान खेळाडूची कसोटीतील कलात्मकता पाहता त्याला आगामी काळात संधी मिळेल काय, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. तसा सलामीवीर म्हणून क्लासिकल शुभमन गिल हा राहुलपेक्षा उजवाच ठरावा. तरी त्यानेही अधिक सातत्य दाखविण्याची गरज आहे. एक बाजू लावून धरण्याच्या दृष्टीने चेतेश्वर पुजारा ही संघाची गरज म्हणता येईल. गरजेच्या वेळी आपण धावांचा वेगही वाढवू शकतो, हे त्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याला वगळून आजतरी संघाचा विचार करता येणार नाही. बांग्लादेश कसोटीत विराटला आपला परफॉर्मन्स दाखविता आला नाही, हे खरे. परंतु, त्याच्यासारखा कसलेला क्रिकेटपटू कधीही फॉर्मात येऊ शकतो. अचूक टायमिंग, फुटवर्कबरोबरच कसोटीकरिता आवश्यक असलेली तंत्रशुद्धता हे विराटच्या फलंदाजीचे वैशिष्टय़ आहे. अलीकडे फिरकीला सुरुवातीला खेळताना तो काहीसा बिचकतो. मात्र, अशा उणिवांवर मात करणे त्याच्यासारख्या खेळाडूसाठी अवघड बाब नव्हे. अर्थात त्याने आगामी कसोटीवर लक्ष केंद्रित करायला हवे. श्रेयस अय्यर हा सर्व फॉरमॅटमधील अलीकडच्या काळातील भारताचा सर्वांत गुणी क्रिकेटपटू ठरतो. त्याच्या खेळात आक्रमकता व बचाव याचा सुंदर मिलाफ आढळतो. सातत्यपूर्ण कामगिरीतून त्याने वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलेले असताना त्याला टी-20 मधून कसे वगळले जाते, हा प्रश्नच. वर्ल्ड कप एकदिवसीय क्रिकेटमधील असो वा कसोटीतील. श्रेयस असणे, ही टीम इंडियाची गरज आहे. बांग्लादेशात त्याने ज्या पद्धतीचा खेळ केला, ते पाहता मालिकावीर हा सन्मान त्यालाच मिळायला हवा होता, असे क्रिकेटप्रेमींना वाटणे, यातच सारे आले. ऋषभ पंतकडे यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पाहिले जाते. स्पर्धेतील ऋषभची कामगिरी समाधानकारक असली, तरी त्याच्यातील गुणवत्तेला पुरेसा न्याय देण्यास तो अजूनही काहीसा कमी पडतोय, असे वाटते. अश्वीनची श्रेयससोबतची मॅच विनिंग भागिदारी त्याचा दर्जाच दाखवून देते. गोलंदाजी, फलंदाजी अशा सर्वच स्तरावर 100 टक्के योगदान देण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्याच्याकडून युवा खेळाडूंनी निश्चितपणे प्रेरणा घ्यावी. मोहम्मद सिराज, उमेश यादव, अक्षर पटेल यांनीही चांगली गोलंदाजी केली. परंतु, पहिल्या कसोटीत 7 बळी घेऊन बांग्लादेशला जेरीस आणणाऱया कुलदीप यादवला दुसऱया कसोटीत का वगळले, हे अनाकलनीय होय. कुलदीप असता, तर कदाचित भारताला विजयासाठी इतके झगडावेही लागले नसते. परंतु, जयदेव उनाडकटला घेऊन काय साधले, हे कळत नाही. अशा प्रकारचे बुचकळय़ात टाकणारे प्रयोग विजयी संघाचा ताळमेळ बिघडवत असतात. त्याबाबत काळजी घ्यायला हवी. थोडक्यात बांग्लादेश कसोटीतून भारताने धडा घ्यावा. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारताने दुसरे स्थान प्राप्त केले आहे. जूनमध्ये होणाऱया या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी सलग दुसऱयांदा भारताला असेल. ऑस्ट्रेलिया 76.92 गुणांसह पहिल्या, 58.93 गुणांसह भारत दुसऱया, तर 54.55 गुणांसह द. अफ्रिका तिसऱया क्रमांकावर आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घरच्या मैदानावर भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडेल. यात आपली कामगिरी कशी राहते, हे महत्त्वाचे. मागील वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये न्यूझिलंडने भारताची संधी हिरावून घेतली होती. आता ऑस्ट्रेलियाचे आपल्यापुढे तगडे आव्हान राहील. सरत्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपपासून आपण वंचित राहिलो. पुढच्या वर्षी कसोटीसह एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचेही जगज्जतेपेद पटकावून हा दुष्काळ संपविण्याकरिता कसोशीने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे. आयपीएलमध्ये तंदुरुस्त असलेले खेळाडू मोक्याच्या क्षणी दुखापतग्रस्त होत असतील, तर त्यांचा संघाला काय उपयोग? म्हणूनच तंदुरुस्त व गुणवत्तापूर्ण संघ मैदानात उतरविण्यासाठी योग्य नियोजन हवे. त्यादृष्टीने राहुल द्रविड व रोहित शर्मा यांनी कामाला लागावे. कारण पुढचे वर्ष खऱया अर्थाने कसोटीचे असेल.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








