वनडेसह कसोटी व टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने शुक्रवारी 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडिया वनडे रँकिंगमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. याआधी भारतीय संघ कसोटी व टी20 क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. यामुळे आयसीसीच्या तीनही क्रमवारीत भारताने एकहाती सत्ता मिळवताना अग्रस्थान काबीज केले आहे.
के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियावरील विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणारा भारत हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती. 2014 मध्ये ते एकाच वेळी कसोटी, वन डे आणि टी20 मध्ये पहिल्या क्रमांकावर होते. दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया अव्वलस्थानावर
आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाचे 116 गुण आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ टॉप 10 मध्ये आहेत. तसेच कसोटी क्रमवारीत भारतीय संघ 118 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचा संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. याशिवाय, टी20 क्रमवारीत टीम इंडिया 264 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ 261 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
संघाच्या कामगिरीशिवाय भारतीय खेळाडू देखील रँकिंगमध्ये मागे नाहीत. टी20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तर वनडे रँकिंगमध्ये मोहम्मद सिराज सर्वोत्तम गोलंदाज आहे. कसोटी रँकिंगमध्ये रविचंद्रन अश्विन सर्वोत्तम गोलंदाज आहे. तर कसोटी रँकिंगमध्ये अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जडेजा पहिल्या, तर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच वनडे फलंदाजांच्या यादीत शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी 20 अष्टपैलूंच्या यादीत हार्दिक पंड्या दुसऱ्या, तर कसोटी गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे.