वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दुबईमध्ये 2025 ची आयसीसीची चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली. भारतीय संघाने आतापर्यंत विक्रमी तीनवेळा या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे. भारतीय संघातून अष्टपैलु कामगिरी करणारा हार्दीक पांड्याने आता भारतीय संघाचे आगामी उद्दिष्ट आयसीसीची भारतात होणारी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणे राहिल, असे म्हटले आहे.
दुबईतील झालेल्या अंतिम सामन्यात हार्दीक पांड्या तसेच रविंद्र जडेजा यांची अष्टपैलु कामगिरी मोलाची ठरली. भारतीय क्रिकेट संघाची यापुढे आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्याची भूक अधिकच वाढली आहे. नजीकच्या काळात भारतीय संघ आयसीसीच्या आणखीन किमान पाच ते सहा स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करेल, असेही पांड्याने म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघाला विजय मिळवून देणे यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असतात. भारतीय संघ सध्याच्या तुलनेत अधिक सर्वोत्तम होण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. सांघिक कामगिरीवरच आम्हाला चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकता आली. चॅम्पियन्स करंडक भारताला मिळवून देणे हे माझे स्वप्न होते आणि ते साकारही झाले. आता भारतात आगामी होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्व चषक स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून देणे हे माझे ध्येय राहिल, असेही हार्दीक पांड्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.









