बुमराह-आकाश दीपची 10 व्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी : केएल राहुल-जडेजाची अर्धशतके
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
एकीकडे भारतीय संघाचे टॉप ऑडर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये संघर्ष करताना दिसत आहे, तर दुसरीकडे गाबा कसोटीत जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी तुफानी फलंदाजी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले आहे. बुमराह-आकाशदीपने उत्कृष्ट बचावात्मक फलंदाजी करत भारताचा फॉलोऑन टाळण्यात मोठी भूमिका बजावली. गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताची नववी विकेट रवींद्र जडेजाच्या रूपाने पडली. तेव्हा भारताची धावसंख्या 9 विकेटवर 213 धावा होती. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला 33 धावांची गरज होती. यादरम्यान, विकेट पडली असती तर, ऑस्ट्रेलियन संघ भारताला पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित करू शकला असता, पण जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपने तसे होऊ दिले नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 9 विकेट गमावत 252 धावा केल्या आहेत. आकाशदीप 27 आणि जसप्रीत बुमराह 10 धावांवर नाबाद परतले आहेत.
सोमवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 51 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. विराट कोहली, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. चौथ्या दिवशी भारताने आपला डाव 51 धावांवरून सुरू केला, मात्र कर्णधार रोहित शर्मा केवळ 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित बाद झाला तेव्हा भारताची 5 बाद 74 अशी स्थिती होती. अशा स्थितीत टीमला फॉलोऑन वाचवण्याचा धोका होता. राहुल आणि जडेजा यांच्यातील 67 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला सामन्यात आणले. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचा धावफलक हलता ठेवला. यादरम्यान शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या राहुलला लियॉनने स्मिथकरवी झेलबाद करत भारताला मोठा धक्का दिला. राहुलने संयमी खेळी साकारताना 8 चौकारासह 84 धावा फटकावल्या.
जडेजाची अर्धशतकी खेळी, बुमराह-आकाशदीपचा जलवा
राहुल बाद झाल्यानंतर जडेजाने नितीश रेड्डी सोबत 53 धावांची भागीदारी केली. जडेजाने शानदार अर्धशतक झळकावताना 123 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 77 धावांचे योगदान दिले. तर नितीश रेड्डीने 16 धावा केल्या. पॅट कमिन्सने या दोघांनाही बाद केले. या दोन भागीदारी होऊनही, एके वेळ भारतीय संघाने 213 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या आणि फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावांची आवश्यकता होती.
जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपने 10 व्या विकेटसाठी आतापर्यंत 39 धावांची भागीदारी केली. योग्य चेंडूंवर फटकेबाजी आणि बचावात्मक फलंदाजी करत या दोन्ही गोलंदाजांच्या फलंदाजी कौशल्याने सर्वच चाहत्यांना प्रभावित केले. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असताना आकाशदीप मोठा फटका खेळू पाहत होता. इतक्यात ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीने संदेश पाठवत खेळाडूंना जणू काही आरामात खेळण्यास सांगितले. यानंतर बुमराह आणि आकाशदीप एक-एक धावा करून खेळत होते. फॉलोऑन टाळण्यासाठी 4 धावांची गरज असताना आकाशदीपने जबरदस्त फटका मारत चौकारासाठी चेंडू पाठवला आणि मैदानावर चाहत्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. फक्त चाहते नाही तर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये गंभीर आणि कोहलीही जोरदार सेलिब्रेशन करताना दिसले.
टीम इंडिया 193 धावांनी पिछाडीवर
भारताने फॉलोऑन टाळल्यानंतर खराब सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा सामना तिथेच थांबवण्यात आला. चौथ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत भारताने 9 बाद 252 धावा केल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 193 धावांची आघाडी आहे. आकाशदीप 27 तर बुमराह 10 धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 4 तर मिचेल स्टार्कने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 445
भारत पहिला डाव 74.5 षटकांत 9 बाद 252 (जैस्वाल 4, केएल राहुल 84, रोहित शर्मा 10, जडेजा 77, नितीश रे•ाr 16, बुमराह खेळत आहे 10, आकाश दीप खेळत आहे 27, पॅट कमिन्स 4 तर स्टार्क 3 बळी).
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, जोस हेजलवूड पुन्हा जखमी
ब्रिस्बेन कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. अनुभवी वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर गेला आहे. तो केवळ या सामन्यातून बाहेरच नाही तर मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये त्याची खेळण्याची शक्यता जवळपास कमी आहे. हेजलवूडला मंगळवारी सकाळी सामन्याआधी सराव करताना दुखापत झाली. यानंतर त्याने सामन्यात केवळ एकच षटक टाकले आणि मैदानाबाहेर गेला. संघ व्यवस्थापनाचे हेजलवूडच्या दुखापतीवर लक्ष असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावेळी स्पष्ट केले.
जडेजाची ऐतिहासिक कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाने कसोटी कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक झळकावले. जडेजाने ही अर्धशतकी खेळी अशा वेळी खेळली जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जडेजा फलंदाजीला आला आणि राहुलच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. एकीकडे राहुल 86 धावा करुन बाद झाला. पण जडेजाने क्रीजवर चिवट खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2017 पासून, जडेजा असा फलंदाज बनला आहे. ज्याने कसोटीत 7 व्या किंवा खालच्या क्रमावर फलंदाजी करताना सर्वाधिक 50 हून अधिक धावा केल्या आहेत. रविंद्र जडेजाने 15 वेळा अशी कामगिरी केली आहे. जडेजानंतर 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना निरोशन डिकवेलाने 12, आगा सलमान 11, क्विंटन डी कॉक 11, अॅलेक्स केरी 10 आणि मेहदी हसन मिराजने 10 वेळा अर्धशतक ठोकले आहे.









