पुढील वर्षी जूनमध्ये पुरुष व महिला संघ करणार दौरा : बीसीसीआयने ट्विट करत दिली माहिती
वृत्तसंस्था/लंडन
भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. बीसीसीआयने गुरुवारी या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. मालिकेतील पहिला सामना 20 जून 2025 पासून खेळवला जाणार असून शेवटचा सामना 31 जुलै पासून सुरू होणार आहे. या मालिकेसह, भारतीय संघ नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 सायकल सुरु करेल. याशिवाय, महिला संघही इंग्लंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात 5 टी-20 व 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने ट्विट करत या दौऱ्याची माहिती दिली.
भारतीय संघ गेल्या 17 वर्षांपासून इंग्लिश भूमीवर कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. 2007 मध्ये भारतीय संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध 1-0 असा मालिका विजय मिळवला होता. यानंतर टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली आहे. मागील दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी मिळवली होती. पण कोविडमुळे मालिकेतील शेवटचा सामना पुन्हा नियोजित करण्यात आला. यानंतर 2022 चा हा शेवटचा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आता, पुढील वर्षी टीम इंडियाला 17 वर्षाचा वनवास संपवण्याची नामी संधी असणार आहे. गुरुवारी बीसीसीआयने टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले.
भारतीय महिला संघही इंग्लंड दौरा करणार
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने भारत-इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय महिला संघाचा दौराही पुढील वर्षी जूनपासून सुरु होणार आहे. जून 2025 मध्ये उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 28 जून रोजी नॉटिंगहॅम, दुसरा सामना 1 जुलै रोजी ब्रिस्टॉल, तिसरा सामना 4 जुलै रोजी लंडन, चौथा सामना 9 जुलै रोजी मँचेस्टर तर शेवटचा सामना 12 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यानंतर उभय संघात वनडे मालिका खेळवण्यात येईल. या मालिकेतील पहिला वनडे सामना 16 जुलै रोजी साऊथम्पटन, दुसरा सामना 19 जुलै रोजी लंडन तर तिसरा सामना 22 जुलै रोजी चेस्टर ली स्ट्रीट येथे होईल.
भारत व इंग्लंड कसोटी सामन्यांचे वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना 20 ते 24 जून, हेडिंग्ले, लीड्स
- दुसरा कसोटी सामना 2 ते 6 जुलै, बर्मिंगहॅम
- तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स
- चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै, मँचेस्टर
- पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट, द ओव्हल.









