ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना पावसामुळे रद्द : मालिकेत 2-1 ने यश : अभिषेक शर्मा मालिकावीर
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मालिकेतील विजयासह वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेतला आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनच्या मैदानात खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि भारतीय संघाने मालिका 2-1 अशी जिंकली. मालिकेत 163 धावा करणाऱ्या अभिषेक शर्माला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
शनिवारी ब्रिस्बेनच्या मैदानातील सामन्यात नाणेफेक जिंकून मिचेल मार्शने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4.5 षटकांच्या खेळात 52 धावा केल्या असताना खराब वातावरणामुळे खेळ थांबला. विजेच्या कडकडाटानंतर पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आणि शेवटी सामना रद्द झाल्याची घोषणा सामनाधिकाऱ्यांनी केली. यामुळे ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली. याआधी, कॅनबेरा येथील पहिला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
टीम इंडियाचा टी 20 मधील दबदबा कायम
विशेष म्हणजे, 2012 पासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पराभूत झालेला नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघावर 2022 नंतर चौथी द्विपक्षीय मालिका गमावण्याची वेळ आली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची मालिका जिंकत टी-20 क्रिकेटमधील आपला दबदबा कायम राखला आहे. एवढेच नाही तर वनडे मालिकेतील पराभवाचीही परतफेड केली.
अभिषेक शर्माचा आणखी एक धमाका
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या टी 20 सामन्यात अभिषेक शर्माने 13 चेंडूत नाबाद 23 धावांची खेळी साकारली. या खेळीसह तो टी-20 आतंरराष्ट्रीय मध्ये सर्वात जलद हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. अभिषेक सर्वात कमी चेंडूत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. अभिषेक शर्मापूर्वी, हा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू टिम डेव्हिडच्या नावावर होता, ज्याने 569 चेंडूंमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. अभिषेकने आता फक्त 528 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला आहे.
सूर्याच्या नेतृत्वात भारत अजिंक्य
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने कधीही टी 20 मालिका गमावलेली नाही. 2023 पासून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने सात मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी एक अनिर्णित राहिली आणि उर्वरित सहा मालिका भारताने जिंकल्या. सप्टेंबरमध्ये सूर्याने भारताला आशिया कप विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 27 सामने जिंकले आहेत.









