वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे झालेल्या 24 व्या आशिया आणि ओसेनिया चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताच्या पुरूष संघाने सुवर्णपदक तर महिला संघाने रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताच्या पुरूष संघाने वैयक्तिक आणि सांघिक गटातील जेतेपद मिळविले.
येथील कंटीरवा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत अमर सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरूष संघाने 739.959 कि.मी. पल्ल्याचे अंतर निर्धारित 24 तासांमध्ये पार करत सुवर्णपदक पटकाविले. भारतीय पुरूष संघाने या शर्यतीला शनिवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ केला होता. अमर सिंगने 258.418 कि.मी.वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. भारतीय पुरूष संघातील सौरव कुमार रंजनने 242.564 आणि गिनो अँटोनीने 238.977 कि.मी. पल्ला नोंदवीत भारताला वैयक्तिक चॅम्पियन्सशीप मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाने रौप्य तर चीन तैपेईने कांस्यपदक मिळविले. रविवारी झालेल्या या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने रौप्य पदक पटकाविले. ऑस्ट्रेलियाने 607.63 कि.मी.चे अंतर नोंदवत सुवर्ण तर चीन तैपेईने 529.082 कि.मी. चे अंतर नोंदवीत कास्यपदक मिळविले. भारतीय महिला संघाने 570.70 कि.मी. चे अंतर नोंदविले.









