आयपीएलनंतर चारच दिवसात इंग्लंड दौरा : भारत अ संघाच्या निवडीबाबत मात्र उत्सुकता
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा दौरा अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, परंतु त्यापूर्वी भारत अ संघ तेथे दोन सराव सामने खेळणार आहे. या सराव सामन्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड कसोटी दौऱ्याच्या तयारीसाठी बीसीसीआय आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. याअंतर्गत, भारत अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन 4 दिवसांचे सराव सामने खेळणार आहे. पहिला सामना 30 मे ते 2 जून दरम्यान कॅन्टरबरीच्या स्पिटफायर मैदानावर तर दुसरा सामना 6 ते 9 जून दरम्यान नॉर्थम्प्टनच्या काउंटी मैदानावर खेळवला जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय भारत अ संघात संभाव्य कसोटी संघातील खेळाडूंचा समावेश करायचा की स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी द्यायची याबद्दल अजूनही कन्फ्यूज आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये अनेक भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक होती, त्यामुळे बीसीसीआयला बहुतेक खेळाडूंनी इंग्लंडमध्ये लवकर पोहोचावे असे वाटते, जेणेकरून ते तेथील परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतील. पण, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. गंभीर यांचे मत लक्षात घेऊन बीसीसीआय संघ निवडण्याची शक्यता आहे. या सामन्यांमध्ये कसोटी संघातील खेळाडूंना मैदानात उतरवायचे की नवीन प्रतिभावान खेळाडूंना संधी द्यायची हे गंभीरच्या सल्ल्यानुसार ठरवले जाईल.
आयपीएल फायनलनंतर अवघ्या चार दिवसात इंग्लंड दौरा
आयपीएल अंतिम सामन्यात आणि इंडिया अ सराव सामन्यात फक्त 4 दिवसांचा फरक आहे. आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाईल. यानंतर अवघ्या चारच दिवसात इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होईल. आयपीएलच्या गट टप्प्यातील सामने 18 मे पर्यंत संपतील, त्यामुळे काही खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी आणि तयारीसाठी वेळ मिळेल. परंतु अंतिम फेरीत असणारे खेळाडू पहिल्या 4 दिवसाच्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाहीत. बीसीसीआय इंडिया अ संघ निवड करताना कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अर्थात, इंग्लंड दौरा भारतीय संघासाठी महत्वपूर्ण असल्याने बीसीसीआय याबाबत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नसल्याचेही सूत्रांकडून समजते.
करुण नायरला संधी मिळण्याची शक्यता
रणजी ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांची बरसात करणाऱ्या करुण नायरला भारत अ संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात नायरने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवताना आपले लक्ष वेधून घेतले आहे. निवड समितीसमोर करुण नायरच्या रुपाने तगडा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान दुखापतग्रस्त झालेला दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमनासाठी प्रयत्नशील असेल.









