नववर्षात उभय संघात रंगणार तीन सामन्यांची टी-20 मालिका : बीसीसीआयकडून घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर आता भारतीय संघ पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिकांसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरू होईल. या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर बीसीसीआयने बुधवारी आणखी एका मालिकेची घोषणा केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला भारत व अफगाण यांच्यात तीन टी-20 सामन्यांची छोटेखानी मालिका खेळवली जाणार असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
बुधवारी बीसीसीआय व अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी या मालिकेची घोषणा केली. मागील दोन वर्षांपासून ही मालिका खेळण्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे ही मालिका शक्य झाली नव्हती. परंतु आता या मालिकेसाठी वेळ मिळाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे खेळवला जाईल. दुसरा सामना 14 जानेवारी रोजी इंदोर येथे होईल. तर 17 जानेवारी रोजी होणाऱ्या अखेरच्या सामन्याचे यजमानपद बेंगळूरला मिळाले आहे. विशेष म्हणजे, आफ्रिका दौऱ्याहून परत आल्यानंतर नववर्षातील टीम इंडियाची ही पहिलीच मालिका असणार आहे. पुढील वर्षी होणारा टी-20 वर्ल्डकप पाहता बीसीसीआयने यासाठी आतापासून प्रयत्न सुरु केले आहेत.









