रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 12 वर्षानंतर चॅम्पियन चषकावर आपले नाव दुबईमध्ये कोरल्यानंतर देशभरात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर संघाने चषक जिंकल्याने संपूर्ण देशात रंगाची उधळण करण्यात आली. तर देशातील प्रमुख शहरांमध्ये शौकिनांनी रस्त्यावर उतरून फटाक्याची आतषबाजी करत मिरवणुकांद्वारे जल्लोष केला. याला बेळगाव शहरही अपवाद नाही. देशातील अनेक नेत्यांसह विविध मान्यवरांनी भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला. बेळगाव शहरातील उपनगरामध्ये रात्री दहानंतर युवा वर्गाने विजयाच्या मिरवणुका काढल्या. त्यामध्ये युवतींचाही मोठा समावेश होता. टिळकवाडी, आरपीडी सर्कल, शहापूर, वडगाव, अनगोळ, हनुमान नगर, मेणसे गल्ली, नेहरु नगर यासह ग्रामीण परिसरातही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.










