पुढील वर्षी जुलैमध्ये 5 टी-20 आणि 3 वनडे सामने खेळणार : इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून घोषणा
वृत्तसंस्था/लंडन
भारतीय संघ पुढील वर्षी पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये 5 टी 20 आणि 3 वनडे सामने खेळवले जातील. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (24 जुलै) 2026 च्या समर होम मालिकेची घोषणा करताना याची पुष्टी केली. उभय संघातील टी-20 मालिका 1 ते 11 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार असून त्यानंतर 14 जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. पुढील वर्षी इंग्लंड संघाच्या उन्हाळी हंगामाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून होईल. त्यानंतर जुलै महिन्यात ते भारताविरुद्ध 5 टी 20, 3 वनडे सामन्यांची मालिका खेळतील. ऑगस्टमध्ये त्यांना पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची तर सप्टेंबर श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. याबाबतचे वेळापत्रक इंग्लंड बोर्डाने गुरुवारी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, भारतीय महिला संघ पुढील वर्षी इंग्लंडचा दौराही करणार आहे. या काळात संघ 3 टी-20 आणि 1 कसोटी सामना खेळेल. ही कसोटी लॉर्ड्सवर होणार आहे.
भारत-इंग्लंड टी-20 मालिकेचा कार्यक्रम
- पहिला सामना 1 जुलै, डरहम
- दुसरा सामना 4 जुलै, मँचेस्टर
- तिसरा सामना 7 जुलै, नॉटिंगहॅम
- चौथा सामना 9 जुलै, ब्रिस्टल
- पाचवा सामना 11 जुलै, साउथहॅम्प्टन
भारत-इंग्लंड वनडे
- पहिला सामना 14 जुलै, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
- दुसरा सामना 16 जुलै, सोफिया गार्डन्स, कार्डिफ
- तिसरा सामना 19 जुलै, लॉर्ड्स, लंडन









