बांगलादेश सहा धावांनी विजयी : गिलची शतकी खेळी व्यर्थ, मुस्तफिजूर रेहमानचे तीन तर सकीब, मेहदी हसनचे दोन बळी
वृत्तसंस्था/ कोलंबो
आशिया चषकातील सुपर 4 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला सहा धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघाने 259 धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला. शुबमन गिल याची शतकी खेळी व्यर्थ गेली.
दरम्यान, चालू स्पर्धेच्या दृष्टिकोनातून या सामन्याला फारसे महत्त्व नव्हते. कारण टीम इंडिया या आधीच आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता, रविवारी भारत व श्रीलंका यांच्यात आशिया चषकाची फायनल रंगणार आहे. तर या विजयासह स्पर्धेतील बांगलादेशचा प्रवास संपला.
शुबमनची शतकी खेळी व्यर्थ

बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. वनडेत पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माला 5 धावांवर सकीबने बाद केले. एका बाजूला विकेट पडत असताना शुबमन गिलने दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी केली. त्याने 133 चेंडूत 8 चौकार व 5 षटकारासह 121 धावांची दमदार शतकी खेळी साकारली. गिलचा अपवाद वगळता अक्षर पटेलने 34 चेंडूत 42 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांना चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी खेळी करता आली नाही. केएल राहुल याने 19 तर सूर्यकुमारने 26 धावा फटकावल्या. शार्दूल ठाकूरने 11 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे भारताचा डाव 49.5 षटकांत 259 धावांवर आटोपला.
प्रारंभी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत पाठवले. अवघ्या 59 धावांत बांगलादेशचे चार फलंदाज तंबूत परतले होते. सलामीवीर हसनला 13 धावांवर शार्दूलने तंबूत धाडले. लिटन दासला मोहम्मद शामीने भोपळाही फोडू दिला नाही. मेहदी हसन मिराज 13 तर अनामुल हकला 4 धावा करता आल्या. पण यानंतर कर्णधार शाकीब आणि तौहिद ह्रदय यांच्यात पाचव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी झाली. शाकीब आणि तोहिदने भारतीय फिरकी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 57 धावांत बांगलादेशचे 4 टॉप फलंदाज बाद झालेले असतानाही त्यांनी 50 षटकांत 8 बाद 265 धावांपर्यंत मजल मारली.
शाकीब, तौहीदची शानदार अर्धशतके
शाकीबने 85 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह 80 धावांची खेळ साकारली. तौहीदने 81 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह 54 धावांची संयमी खेळी केली. एस हुसैन याला मोठी खेळी करता आली नाही. हुसैन फक्त एका धावेवर बाद झाला. अखेरच्या टप्प्यात नसुम अहमदने मोक्याच्या क्षणी 45 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार 44 धावांची खेळी केली. मेहदी हसनने नाबाद 29 धावा करत चांगली साथ दिली, यामुळे बांगलादेशला अडीचशेचा टप्पा गाठत आला. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 आणि मोहम्मद शमीने 2 बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 50 षटकांत 8 बाद 265 (शाकीब अल हसन 80, तौहीद 54, नसूम अहमद 44, मेहदी हसन नाबाद 29, साकीब नाबाद 14, शार्दुल 65 धावांत 3 बळी, शमी 32 धावांत 2 बळी)
भारत 49.5 षटकांत सर्वबाद 259 (शुबमन गिल 121, सुर्यकुमार यादव 26, अक्षर पटेल 42, मुस्तफिजूर रेहमान 50 धावांत 3 बळी, सकीब व मेहदी हसन प्रत्येकी दोन बळी).
वनडेत जडेजाचे दोनशे बळी

अष्टपैलू रवींद्र जडेजाने शमीम हुसेनला आऊट करत एक खास पराक्रम केला आहे. या सामन्यात जडेजाने 200 वनडे विकेट्स पूर्ण केल्याच, पण एका खास विक्रमात कपिल देव यांच्या पावलावर पाऊल टाकले. जडेजाने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात शमीम हुसेनला पायचीत पकडले. वनडे क्रिकेटमधील जडेजाची ही 200 वी विकेट होती. अष्टपैलू जडेजा याने फलंदाज म्हणून वनडे क्रिकेटमध्ये 181 सामन्यांमधील 123 डावांमध्ये 2578 धावा केल्या आहेत. माजी दिग्गज कपिल देव यांच्यानंतर जडेजा केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून 2000 धावा आणि गोलंदाजी करताना 200 विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव यांनी आपल्या वनडे कारकिर्दीत 225 सामने खेळले. यापैकी 221 सामन्यांमध्ये त्यांना 253 विकेट्स मिळाल्या, तर फलंदाजी करताना 3783 धावा केल्या. तसेच दोनशे बळींचा टप्पा गाठणारा जडेजा सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, अजित आगरकर, झहीर खान, हरभजन सिंग आणि कपिल देव यांनी ही कामगिरी केली आहे.
कर्णधार रोहितच्या नावेही अनोखा विक्रम

बांगलादेशविरुद्ध लढतीत कर्णधार रोहित शर्माने 14 व्या षटकात एक अप्रतिम झेल घेत खास यादीत आपले नाव जोडले. रोहितच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 झेल पूर्ण झाले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा पाचवा सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे. या यादीत 303 झेल घेणारा विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू –
- विराट कोहली – 303 झेल
- स्टीव्ह स्मिथ – 288 झेल
- जो रुट – 280 झेल
- डेविड वॉर्नर – 203 झेल
- रोहित शर्मा – 200 झेल









