आयर्लंड दौऱ्यासाठी सितांशू कोटक यांच्याकडे जबाबदारी : राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना विश्रांती
वृत्तसंस्था/ मुंबई
टीम इंडिया पुढील आठवड्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून कोचिंग स्टाफमध्येही काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यासाठी प्रशिक्षक असतील असे मानले जात होते पंरतु या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. आता, टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून सितांशू कोटक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढील काही महिन्यात टीम इंडियासाठी भरगच्च असे कार्यक्रम आहेत. आशिया चषक, आशियाई गेम्स आणि आयसीसी वनडे विश्वचषक अशा महत्वाचा मालिका होणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघ तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आयर्लंड दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा अशा प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. याशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड विश्रांतीवर आहेत. अशात आयर्लंडविरुद्ध मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतील, अशी आशा होती. पण लक्ष्मण यांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. अशावेळी सितांशू कोटक यांच्याकडे आयर्लंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सितांशु कोटक बेंगलोरच्या एनसीएमध्ये फलंदाजी प्रशिक्षक आहेत. यापूर्वी त्यांनी भारत अ संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मंगळवारी डब्लिनला रवाना होणार आहे. उभय संघातील पहिला टी-20 सामना 18 ऑगस्ट रोजी डब्लिन येथे होईल.
आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
उभय संघातील मालिकेचे वेळापत्रक –
- 18 ऑगस्ट – पहिला टी-20 सामना (डब्लिन)
- 20 ऑगस्ट – दुसरा टी-20 सामना (डब्लिन)
- 23 ऑगस्ट – तिसरा टी-20 सामना (डब्लिन)









