19 जानेवारीपासून द.आफ्रिकेत स्पर्धेला प्रारंभ : उदय सहारनकडे नेतृत्वाची धुरा
वृत्तसंस्था/ मुंबई
पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या यू-19 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताने संघाची घेषणा केली असून उदय सहारनकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या यू-19 आशिया चषक स्पर्धेत खेळत असलेला संघच विश्वचषकासाठी कायम ठेवला आहे. यू-19 विश्वचषक स्पर्धा 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
पंजाबचा 19 वर्षीय उदय सहारन दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेतही संघाचे नेतृत्व सांभाळेल. या मालिकेत इंग्लंड हा तिसरा संघ असून 29 डिसेंबरपासून त्याची सुरुवात होईल. या तिरंगी मालिकेनंतर संघ वर्ल्डकपची तयारी सुरू करेल. बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समितीने बुधवारी या संघाची घोषणा केली. दरम्यान, तिरंगी मालिकेनंतर टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकाची तयारी सुरू करेल, असे बीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
सहा मराठी खेळाडूंना संधी
युवा वर्ल्डकप संघात 6 मराठमोळ्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. आहे. यात अर्शिन कुलकर्णी आणि सचिन धस हे महाराष्ट्राकडून खेळतात. तर मुशीर खान मुंबईकडून खेळतो. या तिघांची मुख्य 15 सदस्यीय संघात निवड झाली आहे. तर मुंबईचा प्रेम देवकर रिझर्वमध्ये आहे. याशिवाय, सोबतच दिग्विजय पाटील आणि किरण चोरमले हे मराठी खेळाडू राखीवमध्ये आहेत. पण हे दोघे संघासोबत प्रवास करणार नाहीत.
युवा विश्वचषक स्पर्धा 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 20 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. स्पर्धेतील एकूण 16 संघांना अ, ब, क आणि ड अशा 4 गटात ठेवण्यात आले आहे. टीम इंडिया अ गटात अमेरिका, बांगलादेश आणि आयर्लंडसह आहे.
सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी युवा संघ सज्ज
आयसीसीकडून 1988 पासून युवा वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे. हे 1998 पासून दर दुसऱ्या वर्षी ंही स्पर्धा आयोजित केले जाते. विशेष म्हणजे, भारताचा युवा संघ हा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये भारत उपविजेता ठरला आहे. यामुळे यंदाही उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात आहे.
यू-19 वर्ल्ड कपसाठी निवडलेला भारतीय संघ : उदय सहारन (कर्णधार), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, मुरुगन अभिषेक, अरावेली अवनीश राव, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
ट्रॅव्हल रिझर्व्ह – प्रेम देवकर, अंश गोसाई व मोहम्मद अमान.
बॅकअप खेळाडू – महाराष्ट्राचा दिग्विजय पाटील, हरियाणाचा जयंत गोयत, तामिळनाडूचा पी विघ्नेश आणि महाराष्ट्राचा किरण चोरमले यांचा बॅकअप खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेची गटवारी
अ गट – भारत, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका
ब गट – इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड
क गट – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया
ड गट – अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ.









