हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा कायम : दौऱ्यात तीन टी-20 व तीन वनडे सामने खेळणार
वृत्तसंस्था/ मुंबई
बांगलादेशविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. या मालिकेतील सर्व 6 सामने मीरपूर येथील शेर-ए-बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे खेळवले जातील. ही मालिका 9 जुलैपासून सुरू होईल. विशेष म्हणजे, निवड समितीने हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा कायम ठेवली आहे. दुसरीकडे मात्र मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये असलेली अष्टपैलू श्रेयंका पाटील हिच्याकडे दुर्लक्ष केले आहे.
वुमेन्स प्रीमियर लीगनंतर भारतीय संघ प्रथमच मैदानावर उतरताना दिसेल. 9 जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यावर भारतीय संघ 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळेल. मागील काही काळापासून संघाच्या नियमित सदस्य असलेल्या रेणूका ठाकूर व रिचा घोष, अष्टपैलू शिखा पांडे व फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड यांना देखील संघात स्थान मिळालेले नाही. तसेच, वुमेन्स प्रीमियर लीग व इमर्जिंग एशिया कपमध्ये मालिकावीर ठरलेल्या फिरकीपटू श्रेयंका पाटील हिच्याकडे देखील दुर्लक्ष केले आहे. अर्थात, बीसीसीआयने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
यष्टीरक्षक रिचा घोष नसल्याने आसामच्या उमा छेत्रीसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. टी-20 आणि वनडे या दोन्ही संघांमध्ये यस्तिका भाटियानंतर दुसरी यष्टीरक्षक म्हणून 20 वर्षीय उमा छेत्रीची निवड झाली आहे. तसेच प्रिया पुनिया दोन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करेल. तर वेगवान गोलंदाज अंजली सरवानी हिची टी-20 संघातील जागा कायम राहिली आहे. अमनजोत कौर ही देखील प्रथमच भारताच्या वनडे संघात सामील होईल. तर फिरकीपटू मोनिका पटेलला प्रथमच भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, बांगलादेशचा हा दौरा भारतीय महिला संघाच्या व्यस्त क्रिकेट दौऱ्याची सुरुवात आहे. टीम इंडिया पुढील 6 महिन्यात न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. याचबरोबर टीम इंडिया इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीही खेळणार आहे. यामुळे आगामी बांगलादेश दौऱ्यात भारतीय महिला संघाच्या कामगिरीकडे लक्ष्य असणार आहे.
भारतीय महिला टी-20 संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, एस मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरे•ाr, मिन्नू मणी.
भारतीय महिला वनडे संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, प्रिया पुनिया कौर, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरे•ाr, स्नेह राणा.
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा –
टी-20 मालिका
9 जुलै, पहिला टी 20 सामना, मीरपूर दु. 1:30 वा.
11 जुलै, दुसरा टी 20 सामना, मीरपूर दु. 1:30 वा.
13 जुलै, तिसरा टी 20 सामना, मीरपूर दुपारी 1:30 वा
वनडे मालिका
16 जुलै, पहिला वनडे सामना, मिरपूर सकाळी 9 वा
19 जुलै, दुसरा वनडे सामना, मीरपूर सकाळी 9 वा
22 जुलै, तिसरा वनडे सामना, मीरपूर सकाळी 9 वा









