ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची धुरा : रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा यांची संघात एंट्री : शिखर धवनला मात्र डच्चू
वृत्तसंस्था/ मुंबई
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शुक्रवारी 15 सदस्यीय भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, अनुभवी शिखर धवनला संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच दोन्ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणार आहेत.
ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची धुरा

बीसीसीआयने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 15 जणांच्या चमूची निवड केली आहे. या संघाचे कर्णधारपद युवा ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडसह, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, प्रभसिमरन यांच्याशिवाय अन्य युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कर्णधारपदाची चर्चा होत असलेल्या शिखर धवन याला संघात देखील आपली जागा बनवण्यात अपयश आले. याशिवाय, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान, शिवम मावी यांचा संघात वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांचा फिरकीपटू म्हणून समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
आशियाई स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेटचा समावेश
आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा सहभाग होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2010 आणि 2014 मध्ये या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला होता. पण भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष किंवा महिला संघ पाठवले नव्हते. यामुळे स्पर्धेत प्रथमच सहभागी होत भारतीय पुरुष व महिला संघ सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रयत्न करेल यात शंकाच नाही. दरम्यान, पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये, बांगलादेश आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले आहे आणि महिलांमध्ये पाकिस्तानने दोन्ही वेळा सुवर्ण जिंकले आहे.
भारतीय पुरुष संघ – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).
राखीव खेळाडू – यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.

हरमनप्रीतच्या नेतृत्वातभारतीय महिला संघ सहभागी होणार
मुंबई : बीसीसीआयने शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये हँगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. याच स्पर्धांमध्ये हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघही भाग घेणार आहे. नेहमीप्रमाणे संघाचे उपकर्णधारपद स्मृती मानधना भूषवणार आहे. दरम्यान, हरमनप्रीत कौर आणि स्मृती यांच्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामने टी-20 प्रकारात खेळवले जाणार आहेत. दरम्यान ही दुसरी वेळ आहे, भारतीय संघ एखाद्या मल्टी स्पोर्ट्स इवेंटमध्ये खेळणार आहे. गतवर्षी राष्ट्रकूल स्पर्धांमध्येही भारतीय महिला क्रिकेट संघाने भाग घेतला होता.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेडी.
राखीव खेळाडू: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर.









