13 सुवर्णांसह भारताला एकूण 24 पदके, इटलीला दुसरे, नॉर्वेला तिसरे स्थान
वृत्तसंस्था/ लिमा, पेरू
दीपक दलाल (545), कमलजीत (543), राज चंद्रा (528) या भारतीय त्रिकुटाने येथे झालेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 50 मी. सांघिक पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
या प्रकारात भारतीय संघाने एकूण 1616 गुण नोंदवत सुवर्ण मिळविताना अझरबैजानच्या संघाला केवळ एका गुणाने हरवले. आर्मेनियाने कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ नेमबाजांनी 13 सुवर्णांसह एकूण 24 पदके पटकावली. त्यात 3 रौप्य व आठ कांस्यपदकांचाही समावेश आहे. इटलीने दुसरे स्थान मिळविताना 5 सुवर्ण, 4 रौप्य, 1 कांस्यपदक तर नॉर्वेने तिसरे स्थान मिळविताना 4 सुवर्णांसह एकूण दहा पदके मिळविली.
रविवारी मुकेश नेलावल्लीने वैयक्तिक प्रकारात कांस्य मिळविले. त्याचे हे एकूण सहावे पदक होते. त्याने 60 शॉट्सच्या अंतिम फेरीत 548 गुण नोंदवले. अझरबैजानच्या इम्रान गारायेव्हने 552 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. कनिष्ठ महिलांच्या 50 मी. पिस्तूल नेमबाजीत परिशा गुप्ताने 540 गुण नेंदवत रौप्य मिळविले तिला हंगेरीच्या मिरियम जॅकोची 546 गुणांची मर्यादा ओलांडता आली नाही. जॅकोची ही कनिष्ठ स्पर्धेतील विश्वविक्रमी कामगिरी आहे. सेजल कांबळे (529), केतन (525), कनिष्का डागर (513) यांनी भारताला याच सांघिक प्रकारात रौप्य मिळवून दिले. यात अझरबैजानने सुवर्णपदक मिळविले. दिवांशीला मात्र 523 गुण नोंदवल्याने तिला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
शेवटच्या दिवशी झालेल्या अन्य प्रकारात कनिष्ठ मिश्र सांघिक ट्रॅप नेमबाजीत भारताच्या शार्दुल विहान व सबीरा हॅरिस यांनी कांस्यपदक मिळविले. शार्दुलने 71 व सबीराने 67 गुण घेत एकूण 138 गुण नोंदवले. झेक प्रजासत्ताकच्या जोडीने 141+8 गुण घेत सुवर्ण व इटलीने 141+7 गुण घेत रौप्य मिळविले. या प्रकारात भाग घेतलेली भारताची दुसरी जोडी झुहेर खान व भव्या त्रिपाठी यांनी एकूण 134 गुण घेत संयुक्त सहावे स्थान मिळविले. आयएसएसएफची या वर्षातील शेवटची वर्ल्ड कप फायनल स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे.