26 रोजी होणार कौन्सिलिंग
बेळगाव : शिक्षकांची पदोन्नतीसाठीची प्रतीक्षा आता संपली आहे. सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी शिक्षकांचे पदोन्नतीसाठीचे कौन्सिलिंग निश्चित करण्यात आले आहे. यामुळे ज्या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त आहेत, त्या ठिकाणी साहाय्यक शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्याध्यापकांचे कौन्सिलिंग झाले. त्यानंतर आता पदोन्नतीसाठी साहाय्यक शिक्षकांचे कौन्सिलिंग होणार आहे. दि. 14 पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असून त्यानंतर अंतिम यादी निश्चित केली जाईल. 26 रोजी जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात साहाय्यक शिक्षकांचे मुख्याध्यापक पदासाठी व मुख्याध्यापकांचे मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापकांसाठीचे कौन्सिलिंग होणार आहे. ज्या शाळांची पटसंख्या 60 पेक्षा अधिक आहे, त्याच शाळांना कायमस्वरुपी मुख्याध्यापक मिळणार आहेत. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांना मात्र प्रभारी मुख्याध्यापकांवरच समाधान मानावे लागणार आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे बेळगाव शहर व परिसरातील अनेक शाळांमध्ये प्रभारी शिक्षकांवरच शाळेचा गाडा हाकला जात आहे.
मराठीसाठी 50 हून अधिक जागांचा समावेश
बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्यामध्ये मराठी शाळा आहेत. यापैकी बऱ्याचशा शाळांमध्ये कायमस्वरुपी मुख्याध्यापक नसल्याने प्रभारींवर काम सुरू आहे. शिक्षण विभागाने कौन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर केल्याने लवकरच या जागा भरल्या जाणार आहेत. या तिन्ही विभागांमध्ये 50 ते 60 जागा मराठीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता शिक्षकांमधून वर्तविली जात आहे.









