खासदार प्रियांका जारकीहोळी : गोकाकमध्ये माध्यमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
बेळगाव : विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षकांच्या हाती असते. शिक्षक पेशाचे पावित्र्य राखून प्रामाणिकपणाने अध्यापनाचे कार्य करीत भविष्यात उत्तम नागरिक घडवत देशाला योगदान द्यावे, असे प्रतिपादन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. गोकाक येथील सतीश शुगर्स अकॅदमी पदवी महाविद्यालय व नाईक स्टुडंट फेडरेशन माध्यमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गोकाक येथे गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार जारकीहोळी बोलत होत्या. शैक्षणिक क्षेत्राला महत्त्व देऊन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या भागासाठी परिश्रम घेतले आहेत. उत्तम समाज, सुदृढ देश निर्माणासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांच्या उन्नत्तीसाठी शिक्षकांबरोबर आम्हीही परिश्रम घेत आहोत, असेही खासदार जारकीहोळी म्हणाल्या.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलपती प्रा. सी. एम. त्यागराज म्हणाले, आपण 40 वर्षे शिक्षक पदावरून सेवा करून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले आहे, यात आपणाला समाधान आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान आहे. नाईक स्टुडंट फेडरेशनद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे. गोकाक तालुक्यासाठी सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज मंजूर झाले आहे. सध्या कॉलेज सुरू करण्यासाठी सतीश शुगर्स अकॅदमी पदवी महाविद्यालयाची इमारत देण्यात येईल, असे मंत्री सतीश जारकीहोळी कळविले आहे. इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाल्यास गोकाक परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय होईल असे प्रदेश युवा काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी म्हणाले. सतीश शुगर्स अॅकॅदमीचे ट्रस्टी विठ्ठल परसन्नवर, गोकाकचे गटशिक्षणाधिकारी जी. बी. बळीगार, सतीश शुगर्स अॅकॅदमीचे प्रशासक प्रकाश लक्ष्मेट्टी, महेश चिकोडीसह सतीश शुगर्स अॅकॅदमी पदवी महाविद्यालय, नाईक स्टुडंटस् फेडरेशनच्या माध्यमिक शाळेचे शिक्षक समारंभाला उपस्थित होते.









