तरुणभारत ऑनलाइन
राज्य शासनाने सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गामध्ये स्वतःचे A4 साईज रंगीत छायाचित्र ( फोटो ) लावण्याचे आदेश दिले आहेत. दोन आठवड्यामध्ये सदरची कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी कळविले आहे. वर्गात शिक्षकांचा फोटो लावणे म्हणजे शिक्षकांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखे असून शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत शिक्षकांनी वर्गात फोटो लावू नयेत असे आवाहन करत सदरचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण व क्रीडामंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आई-वडिलांनंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते दृढ असते शिक्षक दिवसभर विद्यार्थ्यांच्या समोरच असतात. प्रत्येक शिक्षकाची प्रतिमा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतेच .अनेक ठिकाणी जे हरवले आहेत त्यांचे फोटो लावले जातात ,वर्गात शिक्षकाचा फोटो लावण्याचा हेतू काय ? शिक्षक म्हणजे अपराधी आहेत की काय ? अशी भावना शिक्षकांच्या मध्ये निर्माण झाली आहे.
“आपले गुरुजी ” हा उपक्रम शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित असून सदरचे प्रश्न सोडवून शिक्षकांचा सन्मान करावा वर्गात फोटो लावण्याचा निर्णय शासनाने तात्काळ रद्द करावा अशी लेखी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण व क्रीडामंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक यांना आज देण्यात आले.यावेळी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीचे भरत रसाळे ,सुधाकर सावंत , राजेंद्र कोरे , संतोष आयरे ,अशोक आरंडे ,दस्तगीर मुजावर , अनिल सरक ,राजेश कोंडेकर, दिलीप माने ,आर टी पाटील ,सहदेव कांबळे ,रवींद्र नाईक, सविता गिरी ,शिवाजी भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.