आनंद मेळाव्यामध्ये पत्रकार-लेखक, बालसाहित्याच्या अभ्यासक स्वाती राजे यांचे मत
बेळगाव : शिक्षण ही आनंददायी बाब आहे. या आनंद यात्रेचा वसा शिक्षकांच्या मनामधून विस्मरणात चालला आहे. तो पुन्हा पुनर्जिवीत करण्याची गरज आहे. तितकेच आपल्यापेक्षा शिक्षकांना जास्त कळते, हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे व विद्यार्थ्यांच्या विश्वासाला शिक्षकांनी पात्र व्हायला हवे, हे मत आहे पत्रकार-लेखक, बालसाहित्याच्या अभ्यासक स्वाती राजे यांचे. अभिजात मराठी संस्थेतर्फे मराठा मंदिर येथे सुरू असलेल्या आनंद मेळाव्यामध्ये जगदीश कुंटे यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये त्यांनी भाषा फौंडेशनचे कार्य, भाषेचे महत्त्व, विद्यार्थी व शिक्षकांची मानसिकता, पालकांची जबाबदारी अशा विविध पैलूंवर आपली मते व्यक्त केली.
भाषा शास्त्राकडे कसे वळलात?
या प्रश्नावर आपण जे काम करतो त्याची मुळे मागे कोठे तरी रुजलेली असतात. त्यामुळे उत्तम गुण असूनही मी कला शाखेकडे वळलो. कविता मला माझी सखी वाटते, शिक्षणानंतरही पत्रकारितेत आले. परंतु तेच तेच लेखक साहित्य पाठवत होते. मुख्य म्हणजे मुलांच्यासाठीचे फार काही साहित्य नव्हते. दरम्यान इंग्रजी शाळा वाढल्या व आपला फास्टर फेणे बाजूला पडला. म्हणून मग आपण वेगवेगळे प्रयोग केले.
इंग्रजी बालसाहित्य अधिक प्रमाणात का आहे?
या प्रश्नावर इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढले. मुले वाचत नाहीत असे नाही. कारण हॅरी पॉटर घेण्यासाठी पहाटेपासून मुलांनी रांगा लावल्या होत्या. म्हणजे मायबोलीची मुले कुठली आहेत, ती जतन करण्यासाठी भाषा फौंडेशन हा उपक्रम मुलांपासूनच सुरू केला. घरीच वाचनालयाची संकल्पना बदलून दोरीवर पुस्तके ठेवली. मुलांना बोलावून साधारण दीड वर्षे प्रयोग केले. बालसाहित्यामध्ये जे लेखक होते त्यांची ओळख मुलांना करून दिली, असे त्यांनी नमूद केले. शिक्षक बहुआयामी असावा, असे सांगत वाड्या, वसत्यांवर आपण ‘थांबा तेथे वाचा’ हा उपक्रम सुरू केला. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पुस्तके ठेवून यक्षगणित स्पर्धा व अन्य स्पर्धा सुरू केल्या. हे सर्व करताना विद्यार्थ्यांची घेण्याची झोळी मजबूत असावी, असे प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही शिक्षकच लोकप्रिय होतात,
या प्रश्नावर शिक्षकांना आपल्यापेक्षा अधिक कळते हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे आणि विद्यार्थ्यांची अशी मानसिकता होण्यासाठी शिक्षकांनी त्या विश्वासाला पात्र व्हायला हवे. मुळात शिक्षक वाचत नाहीत. त्यामुळे त्यांची अभ्यासावर पकड नाही. केवळ धडा शिकविणे एवढेच शिक्षकाचे काम नाही. तर शिक्षण ही आनंदाची बाब आहे, हा वसा त्यांनी चिरंतन लक्षात ठेवायला हवा, असेही त्यांनी सांगितले. घर ही मुलांच्या भाव, जीवनाची जागा आहे. शिक्षक जे विश्व मुलांसमोर खुले करतात, ते मुलांमध्ये रुजवण्याची जबाबदारी पालकांची आहे. पालक आणि शिक्षक आपल्या मनात जे पेरतील तेच मुले पुढे नेतील. म्हणूनच भाषेचा होणारा ऱ्हास थांबविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे असे त्या म्हणाल्या. व्यासपीठावर सुनिता देशपांडे व सुहास सांगलीकर होते.









