देशभरात शिक्षकांना प्रशिक्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात मुलांमध्ये स्थुलत्वाची समस्या वाढत आहे आणि हा देशासाठी धोरणात्मक चिंतेचा विषय ठरला आहे. शालेय मुलांमध्ये साखरेचे अधिक सेवन कमी करणे आणि कमी वयापासूनच सकस खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्याची गरज असून याकरता शिक्षण मंत्रालय प्रयत्न करत असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
देशाच्या प्रत्येक राज्यात हेल्थ अँड वेलनेस अॅम्बेसिडरच्या स्वरुपात शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत 11 लाखाहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली आहे.
संशोधन अहवालातून खुलासा
तामिळनाडूत सर्वाधिक 5.70 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिक्षण विभागाने एका मार्गदर्शक सूचनेद्वारे शाळांना अनेक स्तरांवर पुढाकार घेण्यास सांगितले आहे. लॅन्सेट या नियतकालिकाच्या अहवालानुसार 2022 मध्ये 5-19 वयोगटातील 12.5 दशलक्ष मुले अधिक वजनाच्या समस्येने ग्रस्त होती. तर 1990 मध्ये ही संख्या भारतात केवळ 0.4 दशलक्ष इतकी होती.
सकस आहारावर जोर
हेल्थ अॅम्बेसिडरच्या स्वरुपात प्रशिक्षण मिळविणाऱ्या शिक्षकांकडून पालकांना स्थुलत्वाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. शाळांच्या कँटीनमध्ये कमी तेलयुक्त भोजनाचा पर्याय असावा आणि पौष्टिक खाण्याला चालना दिली जावी. शाळा आणि घरांमध्ये आरोग्यवर्धक स्वयंपाक तयार करण्याच्या तंत्रज्ञानांवर जोर देण्यात यावा असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.









