रस्त्यावर येऊन सर्व्हर शोधण्याची शिक्षकांवर वेळ
बेळगाव : राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी प्राथमिक शिक्षकांना मोबाईलमध्ये अॅप देण्यात आले असून द्वारे माहिती अपलोड केली जात आहे. मात्र हे सर्व्हेक्षण राज्यभरात एकाचवेळी सुरू करण्यात आले असल्याने सर्व्हरडाऊन समस्या निर्माण झाली आहे. परिणामी माहिती अपलोड करण्यास विलंब होत आहे. सध्या सुरू असलेले सर्वेक्षणाचा जात जनगणना म्हणून प्रचार जात आहे. मात्र हे सर्वेक्षण जात जनगणना नसून एक व्यापक सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण असल्याचे नुकतेच राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सी. एम. कुंदगोळ यांनी स्पष्ट केले आहे.
या सर्वेक्षण कामासाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये सर्वेक्षणसाठी आवश्यक असलेले अॅप डाऊनलोड करून देण्यात आले आहे. मात्र हे सर्वेक्षण राज्यभरात एकाचवेळी सुरू असल्याने अॅपद्वारे ऑनलाईन माहिती अपलोड करताना अनेक तांत्रिक समस्यांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे. विशेष करून सर्व्हर डाऊन समस्या अधिक सतावत आहे. खानापूर तालुक्यातील डोंगराळ भागात तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले जात असले तरी शहर व तालुक्यातही सर्व्हे करताना सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी आलेल्या शिक्षकांना नेटवर्कसाठी रस्त्यावर थांबून सर्व्हरचा शोध घेण्याची वेळ आली आहे.









