उच्च न्यायालयाच्या मनाईचा दिला दाखला : कुमार गंधर्व रंगमंदिरात बराचकाळ गोंधळाची स्थिती
बेळगाव : महानगरपालिकेने बीएलओंसाठी मतदार नोंदणीसाठी प्रशिक्षणाचे शुक्रवारी आयोजन केले होते. परंतु, सरकार तसेच उच्च न्यायालयाने शिक्षकांना बीएलओ कामातून सुटका दिली असताना महापालिका मात्र कामावर जुंपत असल्याचा आक्षेप घेत सरकारी शाळांमधील शिक्षकांनी प्रशिक्षणावर बहिष्कार घातला. यामुळे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे बराचकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मतदार नोंदणीसाठी सरकारी शाळांमधील शिक्षकांना जुंपले जाते. याचा परिणाम सरकारी शाळांमधील गुणवत्तेवर होत आहे. घरोघरी जाऊन मतदार नोंदणीसाठी सर्व्हे करावा लागत असल्याने यामध्ये बराचवेळ वाया जातो. त्यामुळे बीएलओ कामातून शिक्षकांची सुटका करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. सरकार तसेच उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या या मागणीला हिरवाकंदील दाखविला होता. एकीकडे सरकारी पातळीवर निर्णय होत असताना दुसरीकडे मात्र शुक्रवारी महापालिकेने सरकारी शाळांतील शिक्षकांसाठी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे मतदार नोंदणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. उपस्थित शिक्षकांनी महापालिकेने दिलेल्या अर्जांवर सह्यादेखील केल्या नाहीत. तसेच सर्व शिक्षकांच्या सह्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना सादर करण्यात आले. बराचवेळ आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी प्रशिक्षणावर बहिष्कार घातला.
300 हून अधिक शिक्षक उपस्थित
बेळगाव महानगरपालिका हद्दीतील 300 हून अधिक शिक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. बऱ्याच शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक असल्याने केवळ एका शिक्षकावर शाळा चालवावी लागत आहे. शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामांनाच शिक्षकांना जुंपले जात असल्याने पालक व शिक्षकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे बीएलओ कामातून शिक्षकांची सुटका करावी, अशी मागणी शिक्षकांकडून पुन्हा एकदा करण्यात आली.
मनपा आयुक्तच उशिराने दाखल
बीएलओ व अंगणवाडी सेविकांसाठी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. परंतु, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी तब्बल दोन तास उशिराने कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यामुळे शिक्षक व अंगणवाडी सेविका कार्यक्रमस्थळी ताटकळत होते. मनपा आयुक्त येताच शिक्षकांनी निवेदन देत कार्यक्रमावर बहिष्कार घातला. परंतु, दोन तास वाया गेल्याने नाराजीही व्यक्त करण्यात येत होती









