मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे विधानसभेत स्पष्टीकरण : शून्य तासाला आमदार क्रूझ सिल्वा यांचा प्रश्न
पणजी : अॅक्सिस बँकेत खाते उघडण्याचे बंधन फक्त शाळांच्या व्यवस्थापनास घालण्यात आले असून शिक्षकांना तसे कोणतेही बंधन नाही. त्यांचे सध्या चालू असलेले कोणत्याही बँकेचे खाते पगार जमा होण्यासाठी चालू शकते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. आमदार क्रूझ सिल्वा यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित कऊन सरकारने शिक्षकांना अॅक्सिस बँकेत खाते उघडणे बंधनकारक केले म्हणून विचारणा केली होती. त्यावर बोलताना डॉ. सावंत पुढे म्हणाले की, काही व्यवस्थापने शिक्षकांच्या वेतनातील 20 टक्के रक्कम कापतात अशा तक्रारी आल्यामुळे ते खाते फक्त शाळा व्यवस्थापनांसाठीच असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. शिक्षकांना त्यांचे बँक खाते बंदलण्याची गरज नाही. ती सोय फक्त व्यवस्थापनासाठी आहे. शिक्षकांसाठी नाही, असेही ते म्हणाले. खाते अॅक्सिस बँकेतच उघडण्याचे बंधन कशाला? तीच बँक कशाला ठरवली? इतर कोणतीही बँक चालू शकते ना? अशा अनेक शंका सिल्वा यांनी विचारल्या. ती बँक राष्ट्रीयकृत नसल्याचे युरी आलेमांव यांनी समोर आणले. सॉफ्टवेअरमुळे अॅक्सिस बँकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले आहे. हवे तर बँक बदलता येऊ शकते, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. अधिसूचना बदलून त्यात सुधारणा करावी, अशी मागणी सिल्वा यांनी केली आणि तशी तयारी डॉ. सावंत यांनी दर्शविली.









