दुपारपर्यंत रखडली प्रक्रिया : परगावच्या शिक्षकांचे हाल
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक बदलीसाठी सुरू करण्यात आलेल्या कौन्सिलिंगला पहिल्याच दिवशी सर्व्हरडाऊनचा फटका बसला. यामुळे बदलीसाठी जिल्ह्याभरातून आलेल्या शिक्षकांना दुपारपर्यंत वाट पहावी लागली. दुपारनंतर कौन्सिलिंग सुरू झाले. परंतु यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करण्याची वेळ आली. सर्व्हरडाऊनच्या समस्येबाबत शिक्षकांनी मात्र संताप व्यक्त केला.
मागील वर्षभरापासून रखडलेल्या बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला. मंगळवार दि. 11 पासून रेल्वेस्टेशनजवळील बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहात कौन्सिलिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यापूर्वी जिल्ह्यातून बदलीसाठी दाखल झालेल्या शिक्षकांना कौन्सिलिंगविषयीची माहिती देण्यात आली. जिल्हाशिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षण संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळी, नोडल अधिकारी सुजाता बाळेकुंद्री यांसह इतरांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
पहिल्यादिवशी प्राथमिक विभागातील क्रीडाशिक्षक व विषय शिक्षकांचे कौन्सिलिंग होते. 300 हून अधिक शिक्षकांचे कौन्सिलिंग असल्यामुळे बी. के. मॉडेल शाळेच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. कौन्सिलिंगला वेळेत सुरुवात झाली तरी तांत्रिक कारणाने प्रक्रिया थांबली. केवळ बेळगावमध्येच नाही तर राज्यभरात हीच समस्या निर्माण झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया
शिक्षण विभागाकडून बदलीसाठीचे वेळापत्रक ठरविण्यात आल्याने संपूर्ण कार्यक्रम नियोजित होता. परंतु सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे दुपारपर्यंत कौन्सिलिंग होऊ शकले नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बदली प्रक्रियेसाठी कौन्सिलिंग घ्यावे लागले. बाहेर गावावरून आलेल्या शिक्षकांनी मात्र या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच यापुढील काळात तरी तांत्रिक समस्या निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याची मागणी केली.









