न्हावेली / वार्ताहर
माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली, सावंतवाडी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री.प्रदीप सावंत यांना नुकताच राज्यस्तरीय मानाचा समजल्या जाणाऱ्या “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने” सन्मानीत करण्यात आले. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू भवनात आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्री. सावंत यांना गौरविण्यात आले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना अविष्कार फाउंडेशन इंडियाच्या वतीने दरवर्षी “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात येते. श्री.प्रदीप सावंत हे गेली २६ वर्षे सावंतवाडी येथील सोनुर्ली विद्यालयात इंग्लिश विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असून ते ‘सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षक – शिक्षकेतर पतपेढीच्या संचालक पदी काम पाहतात. तसेच ‘नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, भारत’ या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ते कार्यरत असून पर्यावरण विषयक त्यांचे अनेक नवनवीन उपक्रम कौतुकास्पद आहेत अविष्कार फाऊंडेशन इंडियाने श्री. प्रदीप सावंत यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड केली. यावेळी अविष्कार फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते श्री. प्रदीप सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक सीतायनकार प्रा. किशनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून इस्रोचे निवृत्त अभियंता आणि सध्याचे इस्रोचे गुजरात युनिटचे प्रमुख नवीनभाई प्रजापती हे होते. याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष डॉ.एम. बी. शेख, पुण्यातील नेसवाडिया कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश चौधरी यांच्यासह अविष्कार फाउंडेशन इंडिया कोल्हापूरचे संस्थापक उपाध्यक्ष सादतखान पाठणा, संस्थापक संचालक सचिन कामत, मदन भाऊ यादव, सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रंगराव सूर्यवंशी, जिल्हा महिला संघटक सौ. स्नेहल कंकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अविष्कार फाउंडेशन इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीची आणि कार्याची माहिती दिली. यावेळी फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार विजेत्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीला शाहीर प्रकाश लोहार आणि मंडळी यांचा पोवाडा कार्यक्रम झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार श्री. ताज मुल्लानी यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Previous Articleसावंतवाडी मतदारसंघात विधानसभेसाठी ठाकरे शिवसेनेचा उमेदवार द्यावा
Next Article सातव्या दिवशी वाजली शिरवली शाळेची घंटा !
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg