सातारा :
एका बाजूला शासनाने काढलेला आदेश आणि दुसऱ्या बाजूला बदलीची प्रक्रिया राबवण्यासाठी खाजगी कंपनी या दोन्हीच्या कात्रीतून शिक्षक चालले असताना त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांच्यावरील निलंबन कारवाई व पत्नीची होणारी चौकशी यामुळे आलेल्या दडपणातून या व्यवस्थेने फलटण शहरातील दिव्यांग उपशिक्षक सचिन शंकर काकडे (वय 43) यांचा पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने बळी घेतल्याची जोरदार चर्चा शिक्षक वर्गात सुरु झाली आहे. जिह्यातील दलित संघटनांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पुर्वीप्रमाणे नाही तर आता राज्य पातळीवरुन थेट एका खाजगी संस्थेद्वारे पोर्टलद्वारे केली जात आहे. त्यातही जीआरनुसार शिक्षक ऑप्शन भरतात. तरीही दिव्यांग, दुर्धर आजारी असलेल्या शिक्षकांच्या तपासण्या पुन्हा करुन त्यांच्यावर कारवाया सुरु केल्या आहेत. त्या कारवाया करण्यापूर्वी तपासणी केली आहे. ही तपासणी सुद्धा दिव्यांग आणि दुर्धर आजाराच्या शिक्षकांची छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिकावू डॉक्टरांकडून अतिशय जाचक पद्धतीने केली जात आहे.
कोणतीही दया-माया दाखवली जात नाही हे सर्व शिक्षक मोठे गुन्हेगार आहेत, अशाच पद्धतीने त्यांच्याशी वर्तणूक करुन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्या कारवाईतील काही शिक्षकांनी कोर्टातून स्टे आणला आहे. याच कारवाईच्या दडपणाखाली अनेक शिक्षक हे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालेले असून त्यांना शाळेवरही जाता येईना, धड घरीही रहाता येईना, तालुक्याच्या ठिकाणी जावून हजेरी लावून आले तरीही सतत दडपण असल्याने अशाच शिक्षकांपैकी फलटणचे सचिन शंकर काकडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शिक्षक वर्गावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पत्नीची दोन दिवसांत तपासणीची तारीख होती. मुळात दिव्यांग मृत्यू पावलेले शिक्षक होते. काकडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून शोकाकूल वातावरणात फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सचिन काकडे हे मनमिळावू स्वभावाचे, हसतमुख आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यावर कारवाई झाल्याने ते सतत दडपणाखाली होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेच्या व्यवस्थेने शिक्षकाचा बळी घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
- मृत्यूपूर्वीच्या स्टेट्सची चर्चा सुरु
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाबाबत अगोदरच नाराजीचा सूर आहे. त्यात सुक्याबरोबर ओलंही जळते अशी म्हण असून त्यात खरे दिव्यांगही या कारवाईच्या कचाट्यात अकडले. त्यामुळे काकडे हेही तणावाखाली होते. त्यांनी बुधवारी रात्री 12 वाजता स्टेटस् ठेवले असून मला अनेकांनी त्रास दिला मी कोणला त्रास देणार नाही हे त्यांचे स्टेट्स सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.
- दलित संघटना आक्रमक
दलित समाजातील शिक्षक असलेले सचिन काकडे यांचा व्यवस्थेने बळी घेतल्याने त्यांच्या या निधनामुळे दलित संघटना आक्रमक झालेल्या असून जिल्हा परिषद प्रशासन, ग्रामविकास विभाग यांच्या विरोधात आक्रमक पवित्र्यात असून आंदोलन करण्याची शक्यता आहे.
- अनेक शिक्षक नोकरीवर लाथ मारण्याच्या तयारीत
ज्यांनी समाज घडवला, ज्यांनी समाजाला दिशा दिली, अशा शिक्षक मंडळींना तपासणी लावून उसाच्या गुऱ्हाळात घालून त्यांचे पार चिपाड करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याने अनेक शिक्षक नोकरीवर लाथ मारण्याच्या तयारीत आहेत. भले तरी नाठाळाच्या हाणू माथी परंतु नाही झुकणार आम्ही या व्यवस्थेला असा बाणा असलेले शिक्षक या व्यवस्थेला वठणीवर आणण्याच्या तयारीत आहेत.








