प्रतिनिधी,कोल्हापूर
Teacher Day Agitation Kolhapur News : राज्यात 66 हजार तर कोल्हापूर जिल्ह्यात 1389 शिक्षकांच्या जागा रिक्त असून,ती तात्काळ भरावी.नव साक्षरता सर्वेक्षण काम पूर्णपणे अशैक्षणिक असून,हे काम शिक्षकांना लावू नये.नवसाक्षरता सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार आहे.यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.हे आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांच्या नेतृत्वाखाली केले.
निवेदनात म्हंटले आहे,नवीन शिक्षक भरती होणे पूर्वी आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या कराव्यात.जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी कार्यरत गावात निवासस्थाने आणि मुख्यालय उपलब्ध करून देईपर्यंत तेथे राहण्याची सक्ती करू नये. 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा.जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या तिसऱ्या,चौथ्या थकबाकीच्या हप्त्याचे अद्यापही प्रदान झालेले नाही.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाला वारंवार विलंब होत आहे.वेतन अनुदान कमी दिले जात आहे.नगरपालिका, महानगरपालिकांमधील काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे शंभर टक्के वेतन महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून द्यावे, स्वतंत्र वेतन पथक गठीत करावे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कंत्राटी शिक्षक सेवक भरण्याची वेट बिगारी पध्दत ताबडतोब बंद करावी.23 जून 2023 चे शासन परिपत्रक रद्द करून बारावी सायन्स उत्तीर्ण विज्ञान विषय शिक्षकांना बीएस्सी पूर्ण करण्यासाठी आवश्यक मुभा द्यावी.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांचे अन्याय सुधारित धोरण शिफारस मागे घ्यावी.ऑनलाईन बदल्यांचे आंतरजिल्हा धोरण कायम असावे.जिल्हांतर्गत बदलीमध्ये टक्केवारी प्रमाण असावे.पदवीधर व अन्य शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक ते निर्णय घ्यावेत.यासह अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.
यावेळी शिक्षक समितीचे प्रभाकर कमळकर,रवळू पाटील,गणपतराव मांडवकर,सुनील कुंभार,वर्षा केनवडे, दिपाली भोईटे,ज्योतीराम पाटील,अर्जुन पाटील,हरिदास वर्णे कृष्णात कारंडे,सुधाकर सावंत,उमेश देर्सई, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.









