वडूज :
येथील शिक्षक दांपत्याची ४१ लाख २० हजार ५५० रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार येथे घडला आहे.
याबाबत दिपाली सचिन कांबळे (वय, ३७, रा. वडूज, ता. खटाव) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सी. कांबळे यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती सचिन गुंडूराव कांबळे हे येथील एका महाविद्यालयात नोकरीस आहेत तर सौ. कांबळे या तात्पुरत्या स्वरूपात सेवेत आहेत. २९ सप्टेंबर २०२४ रोजी श्री. कांबळे यांना फेसबुकवर ओरीजनल कॅपीटल टीम नावाची जाहिरात आली होती. त्यामध्ये गुंतवलेल्या रक्कमेवर ८०० टक्के नफा मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सौ. कांबळे यांनी आपला भ्रमणध्वनी त्या जाहीरातीच्या कमेंटमध्ये दिला. त्यानंतर ओरीजीन प्रोजेक्ट टीम नावाच्या व्हॉटसअप ग्रुपला श्री. कांबळे यांना एका अनोळखी महिलेने समाविष्ट केले. त्यानंतर श्री. कांबळे यांनी आयबीकेआर प्रो हे अॅप डाऊनलोड केले. त्याचदिवशी एका अनोळखी इसमाने श्री. कांबळे यांना व्हिडीओ कॉल करून आपणास प्रथम डीमॅट अकाऊंट काढावे लागेल व त्यामध्ये काही रक्कम गुंतवावी लागणार असल्याचे इंग्रजीत सांगितले. त्यानुसार श्री. कांबळे यांनी सौ. कांबळे यांच्या नावाचे डीमॅट अकाऊंट काढले. त्यानंतर अन्य एका अनोळखी इसमाने त्याचा मोबाईल क्रमांक ९१६२३२३७०१७४ वरून श्री. कांबळे यांना व्हॉटसअप कॉल करून आपल्या असिस्टंटशी बोलण्यास सांगितले. त्यावेळी एका अनोळखी महिलेने माहिती दिली. त्यानुसार श्री. कांबळे यांनी त्या खात्यावर ५० हजार रूपये जमा केले व त्यामधील ५ हजार रूपये सौ. कांबळे यांच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर जमा झाले होते. त्यामुळे सौ. कांबळे यांच्या नावे काढलेल्या डी मॅट खात्याच्या माध्यमातून फायदा झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर एका अनोळखी इसमाने श्री. कांबळे यांना व्हिडीओ कॉल करून महिन्याला चार आयपीओ व काही स्टॉकचे टार्गेट दिले होते. त्यामुळे श्री. कांबळे यांनी २६ सप्टेंबर २०२४ ते ५ नोव्हेंबर २०२४ या काळात सौ. कांबळे यांच्या खात्यावरून विविध तीन बँकांच्या खात्यांवर १५ लाख ७६ हजार ५० रुपये पाठविले.
याशिवाय कांबळे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावरून विविध सात बँकांच्या खात्यावर २५ लाख ४४ हजार ५०० रूपये पाठविले. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आयबीकेआर प्रो अॅपमध्ये गुंतवलेली रक्कम व त्याचा नफा श्री. कांबळे यांना मोबाईलवर आला नाही. त्यामुळे कांबळे दांपत्यांने संबंधित अनोळखी इसमांशी संपर्क केला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे आयबीकेआर प्रो अॅपच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून ओरीजनल कॅपीटल टीम मधील अनोळखी इसमांनी बनावट अॅपच्या माध्यमातून आम्हाला व्हिडीओ कॉ लद्वारे ८०० पट ज्यादा रक्कम देण्याचे खोटे अमिष दाखवत आमचा विश्वास संपादन करून विविध खात्यांत रक्कम भरण्यास सांगितली. अनोळखी इसमांनी संगणकीय साधनांचा व मोबाईलचा वापर करून ४१ लाख २० हजार ५५० रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार कांबळे यांनी सातारा सायबर क्राईमकडे केली आहे. तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत.








