राजश्री नागराजू यांचे प्रतिपादन : इनरव्हील क्लब पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ
बेळगाव : सरकारकडून जनता ज्या कामांची अपेक्षा करते त्यातील बहुसंख्य कामे इनरव्हील, रोटरी व तत्सम संस्था करतात. या संस्थांनी आता शाळेमध्ये जाऊन सेवाभावी तत्त्वावर विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज आहे. कारण शाळा असल्या तरी शाळेत उत्तम शिक्षकांची वानवा आहे. कोणत्याही संधीची वाट न पाहता संधी निर्माण करणे आणि ती न दवडणे महत्त्वाचे आहे, असे मत मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी व्यक्त केले. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या अधिकारग्रहण समारंभात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर इस्टालिंग ऑफीसर डॉ. सोनल धामणकर, नूतन अध्यक्षा मंजिरी पाटील, सचिव उर्मी शेरेगार, मावळत्या अध्यक्षा शालिनी चौगुले, सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर व नूतन कार्यकारिणी सदस्या उपस्थित होत्या. खऱ्या अर्थाने आज शाळेच्या बाहेर शिक्षण मिळत आहे. समाजात अनेक गोष्टींबाबत परिवर्तनाची गरज आहे. परंतु आपण नागरिक मौन धारण करून बसल्यामुळे विघातक वृत्ती बळावत आहेत. आपण बोलण्याचे धाडस करायला हवे. लढ्याच्या गोष्टी परस्परांना सांगायला हव्यात. अपेक्षा आणि शक्यता यांचे अडथळे ओलांडून मोकळे होऊन परस्परांच्या मदतीसाठी पुढे या, असेही हलगेकर म्हणाल्या.
याप्रसंगी नूतन अध्यक्षा म्हणून मंजिरी पाटील, सचिव उर्मी शेरेगार आणि त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांना डॉ. सोनल धामणकर यांच्या हस्ते अधिकार प्रदान करण्यात आले. प्रारंभी शालिनी चौगुले यांनी स्वागत केले. शर्मिला कोरे व डॉ. आसावरी संत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पुष्पांजली मुक्कण्णावर यांनी गतवर्षाचा आढावा सादर केला. शालिनी चौगुले यांनी त्यांच्या कालावधीतील समारोपाचा उपक्रम राबविताना पाच विविध व्यक्ती आणि संस्थांना मदत देऊ केली. शालिनी चौगुले यांनी सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. यानंतर डॉ. सोनल धामणकर यांनी सर्वांना अधिकारग्रहण प्रदान करताना समाजकार्य करताना फार मोठा प्रकल्प हाती घ्यावा असे नाही. गरजवंत आणि वंचितांना लहान स्वरुपात केलेली मदत मोठी आहे, असे सांगून इनरव्हीलचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. नूतन सदस्यांची ओळख स्मिता दळवी यांनी करून दिली. लता कित्तूर यांनी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून दिली. मंजिरी पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारी शाळांची दुरुस्ती, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, भव्य क्रीडा स्पर्धा यासह अनेक उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. क्लबच्या ज्येष्ठ व सक्रिय सदस्या म्हणून लीना जठार यांचा सत्कार करण्यात आला. रूपा देशपांडे यांनी लकी लेडीची घोषणा केली. गतवर्षातील सक्रिय सदस्य म्हणून स्वाती उपाध्ये यांना बक्षीस देण्यात आले. उर्मी शेरेगार यांनी पुढील उपक्रमांची घोषणा केली. सूत्रसंचालन तेजू दळवी व प्रिया खटाव यांनी केले.









