वृत्तसंस्था/ लॉसेन
पाकचे मोहम्मद तय्यब इक्रम यांची शनिवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पाकचे इक्रम हे आशियाई हॉकी फेडरेशनचे विद्यमान सीईओ आहेत.
यापूर्वी भारताचे नरिंदर बात्रा हे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे प्रमुख होते. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन काँग्रेसच्या झालेल्या 48 व्या सर्वसाधारण बैठकीमध्ये नव्या अध्यक्षाची निवड मतदानाद्वारे करण्यात आली. पाकचे मोहम्मद तय्यब इक्रम आणि बेल्जियमचे मार्क क्वाड्रॉन हे अध्यक्षपदासाठी उमेदवार होते. मतदानामध्ये इक्रम यांनी क्वाड्रॉन यांचा 79-47 अशा मतांनी पराभव केला. आता पाकचे मोहम्मद तय्यब इक्रम हे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे नवे अध्यक्ष असून त्यांचा कालावधी दोन वर्षांचा राहील. 2016 साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी नरिंदर बात्रा यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी गेल्या जुलै महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.









