वार्ताहर /हरमल
गोव्यातील भाजप सरकारने टॅक्सी व्यावसायिकांची मुस्कटदाबी केली असून आम्ही न्याय हक्कासाठी बुलंद आवाज सरकार व लोकप्रतिनिधीपाशी मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत, तो आवाज सरकारने दाबून ठेऊ नये, आमच्या कुटुंबाची चौकशी करून काहीही साध्य होणार नाही, अशी खंत समाजकार्यकर्ते संजय कोले यांनी व्यक्त केली.
सरकार आपल्या यंत्रणेमार्फत पेडणे भागातील टॅक्सीवाल्यांचे नेतृव करण्राया कार्यकर्त्यांची इत्यंभूत माहिती गोळा करीत आहेत,ही शरमेची गोष्ट आहे.आपल्या चौथी इयत्तेत शिकण्राया मुलाकरवी आपल्या कुटुंबातील सदस्य काय करतात,कितीजण आहेत,आई वडील काय करतात,अशी चौकशी करून सरकार जनतेचा बुलंद आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याचा जाहीर निषेध करतो,असे कोले यांनी सांगितले.
गेली 15 वर्षे टॅक्सी व्यावसायिकांनी आपणास नेतृत्व करण्याची संधी दिली. मोपा विमानतळावर परप्रांतीय लोकांना रोजगाराच्या संधी देऊन स्थानिक लोकांना व व्यावसायिकांचे जिणे हराम केले आहे.पेडणेवासीयांना उपाशी मारलेत आम्ही नेमके काय करायचे व कसे जगायचे असा सवाल कोले यांनी व्यक्त केला.









