अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा, 27 ऑगस्टपासून लागू होणार : व्यापार करारावेळी अंतिम निर्णय होण्याचे संकेत
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील करात 25 टक्क्यांची वाढ केली असून आता हा कर 50 टक्के करण्यात आला आहे. तथापि, या कराचे कार्यान्वयन 27 ऑगस्टपासून होईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. 25 ऑगस्टला भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळांची व्यापार करारासंबंधी चर्चा होणार आहे. या चर्चेवर या कराचे आणि भारत-अमेरिका व्यापार संबंधांचे भवितव्य अवलंबून असेल, असे राजकीय आणि आर्थिक तज्ञांचे मत आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी या संबंधातील प्रशासकीय आदेश प्रसिद्ध केला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबविलेले नाही. या तेल खरेदीमुळे रशियाच्या युद्ध लांबविण्याच्या क्षमतेत वाढ होत आहे. या स्थितीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अमेरिकेच्या सुरक्षेवरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कायद्यांच्या अनुसार भारतावरील करांमध्ये वाढ करण्यात येत आहे. या वाढीव कराच्या कार्यान्वयाचा प्रारंभ आणखी 21 दिवसांच्या नंतर होईल. मात्र, मधल्या काळात परिस्थितीत परिवर्तन झाले, तर हा निर्णयात परिवर्तनही होऊ शकते, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्ष ट्रम्प यांनी चर्चेसाठी खिडकी उघडी ठेवली असून काहीशी लवचिक भूमिका स्वीकारल्याचे त्यांच्या नव्या आदेशावरुन दिसून येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
भारत, रशियावर अवलंबून
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारत आणि रशिया यांनी काही वेगळा निर्णय घेतल्यास किंवा अन्य देशांनी काही प्रतिशोधात्मक (रिटॅलिएटरी) निर्णय घेतल्यास अमेरिकेच्या या आदेशात त्यानुसार परिवर्तन केले जाऊ शकते, असेही या प्रशासकीय आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रशासकीय आदेश अंतिम नसून त्यात परिवर्तन होण्याला वाव ठेवण्यात आला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी हा आदेश अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री उशिरा प्रसारित केला. भारतावर अतिरिक्त कर लावला जाईल, याचा स्पष्ट संकेत मंगळवारीच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत त्यांच्याकडून देण्यात आला होता.
कोणत्या वस्तूंची सुटका
हा आदेश 21 दिवसांच्या नंतर, अर्थात 28 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. त्या कालावधीनंतर भारताकडून अमेरिकेच्या सीमाशुल्क कक्षेत ज्या भारतीय वस्तू प्रवेश करतील किंवा ज्या वस्तू तोवेळपर्यंत वाहतुकीच्या प्रक्रियेत असतील, किंवा ज्या वस्तूंना या करातून पूर्णत: सुटका देण्यात आली आहे, अशा वस्तूंवर हा कर लागू होणार नाही, अशीही व्यवस्था या आदेशात करण्यात आली आहे.
चर्चा निर्णायक ठरणार
25 ऑगस्टला अमेरिकेचे एक व्यापारी आणि प्रशासकीय प्रतिनिधीमंडळ भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार करारासंबंधी चर्चा करण्यासाठी भारतात येत आहे. या चर्चेला आता अत्याधिक महत्व प्राप्त झाले असून ती चर्चा अंतिम आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भारतानेही या चर्चेसाठी सज्जता केली असून त्यानंतर या आदेशाचे स्वरुप निर्धारित होईल, अशी शक्यता आहे.
काही महत्वाच्या वस्तू करमुक्त
अध्यक्ष ट्रंप यांनी 30 जुलैला भारतावर प्रथम 25 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली, तेव्हा या करातून औषधे, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि इतर काही वस्तूंना या करापासून मुक्त ठेवले होते. या वस्तू वाढीव करापासूनही मुक्तच राहणार आहेत, असे नव्या आदेशावरुन दिसून येत आहे. तसेच 28 ऑगस्टपासून या आदेशाच्या कार्यान्वयनाला प्रारंभ होईल, त्याआधी त्याच्यात परिवर्तनही होऊ शकते, असा या प्रशासकीय आदेशाचा अर्थ लावला जात आहे.
घेणार देशहिताची दक्षता
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा नवा आदेश अन्यायपूर्ण आहे, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय व्यापारात नेहमीच नियमांचे पालन केले आहे. भारतावर अशा प्रकारे प्रचंड कर लागू करण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही. मात्र, भारत आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यास कटिबद्ध असून योग्य तो निर्णय घेईल, असे प्रतिपादन भारताने केले आहे.
करवाढ आणि परिणाम
ड अमेरिकेचा भारतावरील एकंदर कर आता 50 टक्के होऊ शकणार
ड मात्र, या नव्या आदेशात परिवर्तनासाठी वाव, चर्चा महत्वाची ठरणार
ड भारत आपल्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणार, सरकारची प्रतिक्रिया









