अलीकडच्या काळात फोन व इमेलद्वारे फसवण्याचे प्रकार देशात सर्वत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ही बाब चिंतेची ठरत आहे. हजारांमध्ये एक तरी फसतोच हे लक्षात घेऊन अशी ठगेगिरी करणारी मंडळी आपले काम नित्य नेमाने चालूच ठेवत असतात. या ना त्या मार्गाने एखाद्याची फसवणूक करुन त्याला लुटायचे हाच त्यांचा क्रम असतो. याबाबतीत आपण सजग नाही राहिलो तर फसगत ही ठरलेलीच. अलीकडे आयटी रिटर्न टॅक्ससंदर्भातही फसवणुकीचे प्रकार होताना दिसले आहेत.
आयकर रिफंडचे संशयास्पद इमेल्स आणि करदात्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. नुकतेच आयटी रिटर्न्स भरून झाले आहेत…तुम्ही निश्चिन्त मनाने ऑफिसमध्ये आला आहात… तुम्ही ईमेल उघडता… आणि पहिलाच मेल असतो; donotreply@incometaxindiafilling.gov.in” eEkeÀJee; donotreply@incometaxindiaefiling.gov.in; वरुन incometax चे मेल. ते सुध्दा ऑफिशियल मेलवरुन आलेले. हे पाहून आपले धाबे दणाणतात… (येथे वाचकांच्या लक्षात आलेच असेल की efiling शब्दातून ‘`e’ ’ हे अक्षर गाळलं आहे आणि ‘`filing’ हा शब्द `filling’ असा लिहून ही फसवी इमेल आयडी बनविण्यात आली आहे.
घाई गडबडीत आपण इमेल उघडून पाहतो… तुमच्या रिटर्न्स फायलिंगमध्ये काही घोळ झाला आहे आणि लवकरात लवकर तुमचे नेटबँकिंग डिटेल्स द्या जेणेकरून “रिफंड अमाऊंट” तुमच्या खात्यात जमा करता येईल. पूर्ण विचार न करता पैसे रिफंड येणार आहेत या आनंदाच्या भरात आणि ई-मेल आयडी अगदी सरकारी वाटून आपण आपले डिटेल्स देऊन मोकळे होतो आणि मग लक्षात येते की, आपण फसवले गेलो आहोत.
नावात किंवा संबंधित मूळ इमेल आयडीच्या स्पेलिंगमध्ये अगदी लक्षात न येण्याइतका एखाद्या अक्षराचा फरक करायचा व हे असे इमेल पाठवून सर्वसामान्य करदात्याला लुबाडायचे असे प्रकार सुरु आहेत. विशेष करून जुलै महिना आला की असे हे सुरू होते. कारण कर भरण्याचा हा महिना असतो. म्हणूनच याला टॅक्स टाइम स्मिशिंग स्कॅम असे म्हणतात.
यामध्ये स्कॅमर बनावट मेसेज पाठवून असे भासवतात व घाबरवतात की ते युझरचे बँक खाते ब्लॉक केले जाईल आणि त्यांचे खाते, त्यांचे पॅन आणि आधार कार्ड तपशीलांसह अद्यायावत केले नाहीतर ब्लॉक होईल. इतकेच नाही तर या Android अॅप A (APK)) फाइल डाउनलोड करण्यासाठी लिंक देखील समाविष्ट केलेली असते. एपीके फाइलला जोडलेले अॅप इन्स्टॉल केले असल्यास, ते अगदी मूळ बँक अॅपसारखे दिसते किंवा वाटते. त्यामुळे संबंधीताला तेच योग्य वाटते. अशा या बनावट अॅपद्वारे युझरची सर्व माहिती भरण्यास सांगून पैसे ट्रान्स्फर केले जातात.
हे स्कॅमर्सद्वार सध्या सुरू असलेल्या आयकर रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेचा ही फायदा घेतात आणि या टॅक्स-टाइम स्मिशिंग मोहिमेद्वारे भारतीय खातेदारांना लक्ष्य करतात. ते युझर्सना त्यांचे वैयक्तिक तपशील देण्याच्या-फसवण्याच्या उद्देशाने लोकप्रिय भारतीय बँकांची तोतयागिरी करून बँक खातेधारकांना फसवे मजकूर संदेश पाठवतात व मजकुराद्वारे फसवणूक करतात.
यामध्ये जसे टॅक्स भरण्यावरुन स्कॅम होतात तसे टॅक्स परतावा करणेसाठीदेखीलही फसवणूक होत असताना दिसते. अशाच प्रकारचे खोटे मेसेज ज्यामध्ये आयकर भरला आहे, त्याचा परतावा मिळणार आहे असे भासवून तसा गोड मेसेज पाठवला जातो. आपण ज्या लिंकवर क्लिक करतो त्याद्वारे एक अॅप डाऊनलोड होते हे प्रत्यक्ष आयकर खात्याशी जुळणारे असते. आपण आपली सर्व माहिती भरतो. अशा माहितीचा वापर स्कॅमर पैसे उडवण्यासाठी करतात. अशाप्रकारे आपल्या खात्यातील रक्कम हडपली जाते.
वारंवार घडणारे हे असे प्रकार लक्षात आल्यावर सरकारने व अर्थखात्याने त्यासंबंधात आपापल्या माध्यमांवर सूचना जाहीर केली आहे. अशा कोणत्याही गैरव्यवहारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी नागरिकांनी काय करावे यासंबंधी माहिती जाहीर केली आहे.
तसेच अशाप्रकारे खात्याविषयी माहिती मागवणाऱ्या कोणत्याही इमेल वा तत्सम संदेशावर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहन केले आहे. मात्र असे असूनसुध्दा फसले जाण्याचे लोकांचे प्रमाण जास्त आहे. हजारांमध्ये एक तरी फसतोच हे लक्षात घेऊन फसवणारी मंडळी रोज ग्राहकांच्या शोधात असतात. कारण करदात्याची मानसिकता. त्याचबरोबर संबंधित विभागाने सूचना किंवा जाहीर केले आहे की जर असे काही असेल तर आपल्याला संबंधित खात्याकडून आपल्या रजिस्टर इमेल वर तसा इमेल पाठवून आपल्याला यथायोग्य “कर सूचना” पाठवली जाईल. तसेच आपण जेंव्हा आपले टॅक्स रिटर्न भरत असतो तेंव्हा आयकर खात्याला आपले अकाऊंट नंबर, IFSC कोड आणि संबंधित इतर माहितीही पुरवलेली असते. ती परत कुठल्यातरी इमेलद्वारा द्यायची आवश्यकता नाही मात्र हे लक्षात न येता आपणाकडून ती दिली जाते. तसेच जर काही टॅक्स रिटर्न परताव्याचे पैसे मिळणार असतील तर संबंधीत खाते ते आपल्या बँक अकाऊंटमध्ये NEFT द्वारे पैसे देते. कोणत्याही करदात्याला असे एखाद्या इमेलच्या माध्यमातून अथवा मोबाईलवर संपर्क साधून अकाऊंटचा तपशील विचारुन मग पैसे देण्याची गरज नसते. तरी, अशा प्रकारच्या गैरव्यवहारातून आपले नुकसान टाळण्यासाठी काळजी घेतली गेली पाहिजे. यामध्ये बँक अकाऊंटची माहिती विचारणाऱ्या कोणत्याही इमेल, फोन वा अन्य कोणत्याही संदेशावर चटकन विश्वास न ठेवता त्याला कोणतेही प्रत्युतर न देणे हेच योग्य ठरते. बँकेविषयी जर का कोणी माहिती विचारण्यासाठी फोन केला तर फोनवर सर्व माहिती देण्याऐवजी त्यांनी प्रत्यक्ष बँकेत भेटणेच योग्य असते. तसेच अशा इमेलमधील कोणत्याही लिंक वर क्लिक न करणे. म्हणून बँका आपल्या ग्राहकांना अधूनमधून ग्राहकांना सतर्कतेबाबत सूचना एसएमएस मेसेजमार्फत करत असतात. कोणत्याही संभ्रमाच्या प्रसंगी आपल्या चार्टर्ड अकौंटंन्टस किंवा अन्य जाणकारांशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नयेत.
आयकर खात्याने या प्रत्येक समस्येसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केलेली आहे. अर्थात हे हेल्पलाईन नंबर मिळवण्यासाठी आयकर खात्याच्या ऑफिशियल संकेतस्थळावरुन घ्यावेत. जर असे संशयित इमेल्स किंवा फोन्स वारंवार येत असल्यास आयकर खात्याकडे त्यासंदर्भात तक्रार करता येते. त्यासंबंधीची सर्व माहिती आयकर खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा आपण आपल्या जवळच्या इन्कम टॅक्सच्या कार्यालयात यासंदर्भात प्रत्यक्ष संपर्क साधू शकतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, उपचारांपेक्षा काळजी बरी या म्हणीतून बोध घेत आपल्यासारख्या करदात्यांनी जखमेवर मलमपट्टी करताना होणारे त्रास सहन करण्यापेक्षा जखमच होऊ न देण्याचा विचार आधी करणे जास्त श्रेयस्कर आहे.
-विनायक राजाध्यक्ष








