आम आदमी पक्ष सरकारवर टीकेचा भडिमार
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमध्ये निवृत्तीवेतनधारकांवर राज्य विकास कराच्या स्वरुपात 200 रुपये प्रति महिन्याला वसूल करण्यासाठी संबंधित विभागाच्या मंजुरीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी आम आदमी पक्षावर टीका केली आहे.
पेट्रोल-डिझेलवर दुसऱ्यांदा व्हॅट वाढविणे आणि वीजदर वाढविल्यावर आता आप सरकारने नवा कर प्रस्तावित केला आहे. आप सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या आश्वासनानुसार वाळू उपशाद्वारे 20 हजार कोटी तर भ्रष्टाचार संपुष्टात आणत 34 हजार कोटी रुपयांचा महसूल जमविण्यास अपयशी ठरल्यावर भगवंत मान सरकार निवृत्तीवेतनधारकांकडून कर वसूल करू पाहत आहे. आप सरकारच्या आदेशामुळे राज्यातील लाखो निवृत्तीवेतनधारक प्रभावित होणार असल्याचा आरोप बाजवा यांनी केला आहे.
पंजाबच्या बिघडणाऱ्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी आप सरकारने काहीच पावले उचलली नाहीत. यामुळे राज्य आता आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर पोहोचले असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे.
आपने नाकारला प्रस्ताव
विकास कर 2018 मध्ये तत्कालीन काँग्रेस मंत्री मनप्रीत सिंह बादल यांच्याकडून लागू करण्यात आला होता असे प्रत्युत्तर आप प्रवक्ते मलविंदर सिंह कांग यांनी बाजवा यांना दिले आहे.
नवज्योत सिद्धू आक्रमक
पंजाब सरकारने अतिरिक्त निधी जमविण्यासाठी एक नवा मार्ग शोधून काढला आहे. सरकारने निवृत्तीवेतनधारकांच्या मासिक पेन्शनवर 200 रुपयांचा विकास कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आम आदमी पक्षाचे सरकार आता विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहे. आम आदमी पक्ष भिकेचे पात्र घेऊन फिरत असून राज्यातील निधी काही व्यक्तींकडून स्वत:च्या खिश्यात टाकला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केला आहे.
आप मंत्री-आमदारांच्या घरांना घेराव
पेन्शनर्सच्या मासिक पेन्शनवर 200 रुपये विकास कर लादण्यात आल्यावर पंजाब पेन्शनर्स असोसिएशन देखील सरकारच्या विरोधात उतरली आहे. 24 आणि 25 जून रोजी पूर्ण पंजाबमध्ये मंत्री आणि आमदारांच्या घरांना घेराव घातला जाईल आणि सरकारच्या आदेशाची प्रत जाळली जाईल असे असोसिएशनचे महासचिव सुरिंदर राम यांनी म्हटले आहे.









