बेंगळूर येथील एकाला बेळगाव जीएसटी अधिकाऱ्यांकडून अटक
बेळगाव : बनावट इनव्हॉइस बनवून तब्बल 43 कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालमत्ता व सेवाकर गुप्तचर महासंचालनालय बेळगाव झोनलने बेंगळूर येथील एकाला अटक केली आहे. या प्रकरणात संशयिताने तब्बल 145 कोटी रुपयांचे बनावट जीएसटी चलन दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाबाबत जीएसटी विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बेंगळूर येथे संबंधित व्यक्तीने बनावट जीएसटी नोंदणी क्रमांक तयार केला. अन्य बनावट कागदपत्रेही तयार केली. सदर खोट्या कागदपत्रांचा वापर करून त्याने खोटा आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडीट) देखील दिला व घेतला. हे सर्व करताना खोटी इनव्हॉइस व बनावट ई-वे बील तयार करण्यात आले.
कोणतीही कंपनी अस्तित्त्वात नसताना केवळ कागदपत्रांमध्ये फेरफार करत हा सर्व प्रकार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याच्यावर बेंगळूर येथे सीजीएसटी कायदा 2017 कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल करून तेथेच अटक केली. त्याला आर्थिक गुन्हे विभागाच्या बेंगळूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. संशयिताच्या बेळगाव येथील ट्रान्झीट रिमांडला विशेष न्यायालयाने मंजुरी दिली. त्यामुळे त्याला बेळगावातील चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 4 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जीएसटी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. आरोपीच्या निवासस्थानी छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी अनेक कागदपत्रे, मोबाईल, तात्पुरती व खोट्या नावाने बनविलेले आधार कार्डे यासह असंख्य पुरावे सापडली आहेत.









