हर्ली बाईक्स, बर्बन व्हिस्की आदींचा समावेश शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या आयात करासंदर्भात चर्चा होत आहे. अमेरिकेच्या काही महत्वाच्या वस्तूंवर भारतात करकपात करण्याचा प्रस्ताव भारताने दिला आहे. या वस्तूंमध्ये हर्ली बाईक्स आणि अमेरिकेत उत्पादित होणारी बर्बन व्हिस्की आदी वस्तूंचा समावेश आहे. हर्ली-डेव्हिडसन बाईक्सवरचा आयात कर 50 टक्क्यांवरून 40 टक्के, तर बर्बन व्हिस्कीवरचा आयात कर 150 टक्क्यांवरून 100 टक्के यापूर्वीच करण्यात आला आहे. या करात आणखी कपात करण्यासाठी भारत राजी आहे, असे अमेरिकेला सूचित करण्यात आले आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यापासून त्यांनी आयात शुल्काचा मुद्दा महत्वाचा मानला आहे. भारतासह इतर देश अमेरिकेच्या वस्तूंवर जितका कर लावतात तितकाच कर अमेरिकाही या देशांतून आयात केलेल्या वस्तूंवर लावणार आहे, असा इशारा त्यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये वारंवार दिला आहे. प्रतिद्वंद्वी कर किंवा रेसिप्रोकल टॅरीफची ही व्यवस्था 2 एप्रिलपासून लागू होणार आहे.
व्यापार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापारविषयक चर्चा केली होती. दोन्ही देशांच्या व्यापारात मोठी वाढ करण्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले होते. याच चर्चेचा पाठपुरावा करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात गेला दीड महिना परस्पर व्यापारावर विस्तृत चर्चा होत आहे. या चर्चेचाच एक भाग म्हणून भारताने अमेरिकेसमोर काही वस्तूंवर कर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे.
अनेक वस्तूंसंबंधी चर्चा
भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चा केवळ बाईक्स आणि व्हिस्की यांच्यापुरतीच मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. अमेरिकेची औषध उत्पादने आणि रासायनिक पदार्थांचीही आयात भारत मोठ्या प्रमाणावर करू इच्छित आहे. त्यासाठीही भारताने अमेरिकेसमोर विविध प्रस्ताव ठेवलेले आहेत. भारताची औषध आणि वैद्यकीय उत्पादनांची बाजारपेठ सध्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेला या बाजारपेठेत स्वारस्य असून औषधे आणि इतर वैद्यकीय उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी व्हावीत असे अमेरिकेलाही वाटते. त्यामुळे या वस्तूंसंदर्भातही विस्तृत चर्चा केली जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
व्यापारात चढउतार
अमेरिकेच्या औषधांच्या भारतातील व्यापारात गेल्या तीन वर्षांमध्ये चढउतार झाले आहेत. 2020-2021 च्या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेकडून 2 हजार 2028 कोटी रुपयांची औषधे खरेदी केली होती. पुढच्या वर्षी हे प्रमाण जवळपास दुप्पट झाले होते. नंतरच्या वर्षात या आयातीत 27.5 प्रतिशत घट झाली होती. 2023-2024 या आर्थिक वर्षात पुन्हा अमेरिकेच्या औषधांचा भारतीय बाजारपेठेतील ओघ वाढलेला दिसून येतो. या व्यापारात स्थिरता यावी, अशी भारताची इच्छा असून ती अमेरिकेच्या कानावर घालण्यात आलेली आहे.
प्रस्ताव स्वीकारला गेल्यास…
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा यशस्वी झाल्यास, तसेच दोन्ही देशांमधील व्यापार करार अस्तित्वात आल्यास दोन्ही देशांची बाजारपेठ दोन्ही देशांसाठी मोकळी होण्याची शक्यता आहे. संरक्षण क्षेत्रातही हे सहकार्य केले जाऊ शकते. आयात करांच्या संदर्भात मतभेद निर्माण न झाल्यास अमेरिकेशी विस्तृत आणि व्यापक व्यापार करार करण्यास भारत सज्ज आहे, अशी माहिती आहे.
अडचणी काय आहेत…
भारताची निर्यात अमेरिकेला आयातीपेक्षा जास्त आहे. याला ट्रम्प यांचा आक्षेप आहे. भारतात अमेरिकेच्या वस्तूंवर कर मोठ्या प्रमाणात लावले जातात हा अमेरिकेचा मुख्य आक्षेप आहे. अमेरिकेची ही व्यापारी तूट भरून काढण्यास भारताने अमेरिकेचे कच्चे इंधन तेल आणि इतर वस्तू विकत घेण्याचीही तयारी ठेवली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ट्रम्प प्रशासनाचा प्रारंभ झाल्यापासून भारत आणि अमेरिका यांच्यात अधिकारी पातळीवर दोनदा चर्चा झाली असून या वर्षाच्या अखेरपर्यंत विस्तृत व्यापारी करार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.









