सांबरा विमानतळाला 45 लाख करनिश्चिती, इतर खर्चावर नियंत्रण : जिल्ह्यात 500 ग्रामपंचायती
बेळगाव : जिल्ह्यात विविध माध्यमातून 110 कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला आहे. यामध्ये ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील आस्थापने, व्यावसायिक, मोबाईल टॉवर, दिवा पट्टी, घरपट्टी, खुल्या जागा, स्वच्छता आदींच्या माध्यमातून ही करवसुली झाली आहे, अशी माहिती जि. पं. ने दिली आहे. जिल्ह्यात 500 ग्रा. पं. आहेत. या सर्व ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये करवसुलीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ग्रा. पं. मध्ये विक्रमी करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. विशेषत: बेळगाव तालुक्यातील सांबरा ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील विमानतळ प्राधिकरणाकडून थकलेला कर वसूल झाला आहे. शिवाय दरवर्षी 45 लाख रुपये विमानतळ प्राधिकरणाला कर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी जमा होणाऱ्या करात भर पडणार आहे. काही ग्रा. पं. ची करवसुली थकली आहे. त्यामुळे गावगाड्यातील विकास कामांनाही खिळ बसणार आहे. मात्र बहुतांशी ग्रा. पं. नी करवसुली पूर्ण केली आहे. यामध्ये अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत पीडीओ व इतर कर्मचाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. मध्यंतरी करवसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. शिवाय काही ग्रामपंचायतीनी विशेष सवलतही दिली होती. त्यामुळे करवसुली करणे सोयीस्कर झाले होते.
कोरोना काळात अधिक थकबाकी
2019 मध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीत ग्रामपंचायतीची थकबाकी अधिक प्रमाणात राहिली होती. शासकीय कार्यालय आणि इतर सर्वच कामकाज बंद राहिल्याने करवसुली झाली नव्हती. मात्र कोरोनानंतर हळूहळू करवसुलीत वाढ झाली आहे. तर यंदाच्या आर्थिक वर्षात तर करवसुली मोठ्या प्रमाणात झाली आहे.
विकासकामांना चालना
जिल्ह्यातील विविध ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. शिवाय लाखो रुपये मालमत्ता करवसूल झाला आहे. त्यामुळे ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये विकासकामांना चालना मिळणार आहे. कराच्या माध्यमातून ग्रा. पं. ना महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे नवीन विकासकामांना प्रारंभ होणार आहे.









