शुक्रवारपर्यंत देणार सभापतीपदाचा राजीनामा: मुख्यमंत्री दिल्लाला, मंत्रिमंडळ पुनर्रचना शुक्रवारी
विशेष प्रतिनिधी/ पणजी
अखेर सभापती रमेश तवडकर यांनी मंत्रिपद स्वीकारण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा प्रश्न संपुष्टात आला. सभापती तवडकर हे शुक्रवारपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देतील, असा अंदाज आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मंगळवारी नवी दिल्लीला रवाना झाले. ते आज बुधवारी सायंकाळी उशिरा गोव्यात परततील. सभापती रमेश तवडकर यांनी पक्षाच्या नेत्यांच्या आग्रहाखातर सभापतीपदाचा राजीनामा देऊन मंत्रिपद स्वीकारण्यास मान्यता दिली. यामुळे गेले काही दिवस फेररचनेबाबत निर्माण झालेला गुंता सुटला.
तवडकरना संतोष यांची सूचना
नवी दिल्लीला गेलेल्या सभापतींनी पक्षाचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पक्षाला तुमची गरज आहे व पक्षाचा जो काही निर्णय असेल तो मान्य करा, अशी सूचना त्यांनी केली. विधानसभा अधिवेशनानंतर सभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा नाही असा निर्णय घेतला होता. आपणास मंत्रिपद नकोच असे म्हटले होते. प्रत्यक्षात दिगंबर कामत, दामू नाईक आदींनी त्यांना मंत्रिपद स्वीकारण्याचा आग्रह धरला होता.
सभापतींनी आपल्या अनेक सहकाऱ्यांची मते आजमावली. सभापतीपद हे घटनात्मक मोठे पद आहे, त्याची शान राखली जावी या एकमेव उद्देशाने हे पद आपण सोडत नाही, असे मत तवडकर यांनी मांडले होते. परिणामी बरेच दिवस मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेचा गुंता त्यामुळे सुटला नव्हता. मात्र राष्ट्रपतींना भेटावयास गेलेल्या रमेश तवडकर यांनी नवी दिल्लीहून गोव्यात परतल्यानंतर मंगळवारी सकाळी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान बरीच चर्चा झाली. त्यानंतर सभापतींनी पक्षासाठी काम करावयाचे असल्याने सभापतीपद सोडण्याचा व मंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय कळविला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दामू नाईक यांच्या दरम्यान मंगळवारी पुन्हा चर्चा झाली. दिगंबर कामत व रमेश तवडकर या दोन्ही नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला. सायंकाळी मुख्यमंत्री नवी दिल्लीला रवाना झाले. बुधवारी 20 रोजी नवी दिल्लीत जीएसटी मंडळाची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत ते सहभागी होतील. त्यानंतर ते रात्री गोव्यात परततील. गोव्यात आल्यानंतर मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. मंत्रिमंडळाची पुनर्रचना शुक्रवारी सायंकाळी होऊ शकते. शनिवारी तवडकर यांनी पणजीत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.









