जगज्जेता डी. गुकेशची पहिल्या फेरीत अनीश गिरीशी लढत
वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी (नेदरलँड्स)
87 व्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेला आज शनिवारपासून येथे सुरुवात होत असून पहिल्या फेरीत जागतिक विजेता डी. गुकेश स्थानिक स्टार अनीश गिरीशी लढेल. गेल्या महिन्यात प्रतिष्ठित जागतिक मुकुट जिंकल्यानंतर हा गुकेशचा पहिलाच स्पर्धात्मक सामना असेल. 2023 चा विजेता असलेला गिरीही एक बलवान खेळाडू आहे.
तथापि, 18 वर्षीय गुकेश उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि सिंगापूरमध्ये चिनी डिंग लिरेनवर मिळविलेल्या विजयानंतर त्याच्याकडून मजबूत मोहिमेची अपेक्षा केली जाऊ शकते. दरम्यान, गुकेशला शुक्रवारी सकाळी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभानंतर लगेचच तो डच शहराकडे रवाना झाला.
पहिल्या फेरीतच भारतीय संघातील पाचही खेळाडू खेळताना दिसणार आहेत. त्यात अर्जुन एरिगेसीचा सामना शेवटच्या क्षणी बदली खेळाडू म्हणून दाखल झालेल्या पेंटाला हरिकृष्णाशी होईल. हरिकृष्णला आणखी एक भारतीय खेळाडू विदित गुजरातीने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतल्याने संधी मिळाली आहे. पहिल्या फेरीतील सर्वांत उत्सुकतापूर्ण लढत आर. प्रज्ञानंदची राहणार असून तो उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हचा सामना करेल. प्रज्ञानंदसाठी 2024 हे वर्ष चांगले राहिले नाही आणि तो या वर्षाची सुऊवात सकारात्मक पद्धतीने करण्याची इच्छा बाळगून असेल.
पाचवा भारतीय खेळाडू लिओन ल्यूक मेंडोंसाकडे इतर चार देशबांधवांइतकी पात्रता नसली, तरी हा तऊण खेळाडू निश्चितच ‘डार्क हॉर्स’ आहे. जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरशी तो पहिल्या फेरीत लढेल. पहिल्या फेरीतील इतर सामन्यांत गतविजेता चीनचा वेई यीचा सामना अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाशा होईल. चॅलेंजर्स विभागात ग्रँडमास्टर आर वैशालीचा सामना अर्जेंटिनाचा सर्वांत तऊण आंतरराष्ट्रीय मास्टर 11 वर्षीय ओरो फॉस्टिनोशी होईल. या विभगातील अन्य एकमेव भारतीय खेळाडू दिव्या देशमुख असून तिचा सामना उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हशी होईल.









