वृत्तसंस्था/ विज्क आन झी (नेदरलँड्स)
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने येथील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत् अर्जुन एरिगेसीवर सुरेख विजय मिळवत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हसोबत आघाडी मिळविली आहे. प्रज्ञानंद आणि अब्दुसत्तोरोव्ह या दोघांचेही प्रत्येकी 2.5 गुण आहेत.
या 19 वर्षीय भारतीय खेळाडूसाठी हा एक उत्तम दिवस ठरला. कारण त्याने कॅटलान ओपनिंग परिपूर्ण पद्धतीने हाताळले, खेळाच्या सुऊवातीच्या थोडीशी अनुकूलता मिळविली आणि नंतर बचावाची सामने मध्य खेळापासून प्रभावीपणे वापरली. हा सामना 60 चालींपर्यंत चालला आणि एरिगेसीला तीन दिवसांतील दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात त्याला पी. हरिकृष्णविऊद्ध पराभव पत्करावा लागला होता.
दुसरीकडे, जागतिक विजेता डी. गुकेशने अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनासोबत बरोबरी साधली आणि वर्षाच्या पहिल्या मोठ्या बुद्धिबळ स्पर्धेतील आपली गुणसंख्या दोनवर नेली. पांढऱ्या सेंगाट्या घेऊन खेळताना गुकेशने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला. मास्टर्स विभागातील संपलेला हा पहिला सामना होता आणि तो फक्त 24 चालींपर्यंत चालला. त्यानंतर बरोबरीला मान्यता देण्यात आली.
नवोदित लिओन ल्यूक मेंडोन्साने हरिकृष्णाशी बरोबरी साधत शेवटी त्याचे खाते उघडले. हरिकृष्णाचा या सामन्यात अपेक्षित प्रभाव पडला नाही. हरिकृष्णाचे 1.5 गुण झाले आहेत. वर्षाच्या पहिल्या सुपर टूर्नामेंटमध्ये नऊ फेऱ्या शिल्लक असताना गुकेश, काऊआना आणि व्हिन्सेंट केमर हे संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत, तर हरिकृष्ण पुढील चार खेळाडूंच्या गटात प्रत्येकी 1.5 गुणासह आहे. चॅलेंजर्स विभागात भारतीय मुलींचा दिवस विसरण्यासारखा राहिला. कारण आर वैशाली कझाकस्तानच्या नोगेरबेक काझीबेककडून पराभूत झाली, तर दिव्या देशमुखला अझरबैजानच्या आयदिन सुलेमानलीकडून पराभव पत्करावा लागला.









