वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एसयूव्ही गटामध्ये टाटा मोटर्स आगामी काळामध्ये हॅरियर आणि सफारी या दोन गाड्या भारतीय बाजारामध्ये सादर करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दोन्ही नव्या गाड्यांचे टीझर कंपनीने अलीकडेच जारी केले असून सदरच्या गाडी खरेदीसाठी 6 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या उत्सवी काळात या दोन्ही सुधारीत आवृत्त्यांच्या गाड्या बाजारात सादर केल्या जातील. टाटाकडून मिळालेल्या माहितीनुसार सफारी आणि हॅरियर यांच्या किमती या सध्याच्या किमतीपेक्षा काहीशा जास्त असू शकतात असेही म्हटले जात आहे. सफारीची सध्याची एक्स शोरूम किंमत 15 ते 25 लाख रुपये इतकी आहे. बाजारात सादर होणाऱ्या नव्या सफारीची एमजी हेक्टरप्लस, महिंद्रा एक्सयुव्ही 700 आणि ह्युंडाईच्या अल्काजरसोबत स्पर्धा होणार आहे. तर दुसरीकडे नव्याने दाखल होणाऱ्या टाटा हॅरियरची किंमत सध्याच्या किमतीपेक्षा काहीशी जास्त असणार आहे, असे समजते. कंपनीची सुधारित हॅरियर गाडी महिंद्रा एक्सयूव्ही 700, एमजी हेक्टर, जीप कंपास यांच्याशी स्पर्धा करेल. सदरच्या नव्या गाडीचे डिझाईन आकर्षक पद्धतीने करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
नव्या गाडीतल्या सुविधा
सदरच्या नव्या गाडीमध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय असेल आणि 1.5 लिटर इंजिनची व्यवस्थादेखील यात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मोठी टच क्रीन, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जिंग, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि क्रूस कंट्रोल यासारख्या आधुनिक सुविधा देखील यात असतील तर 6 एअर बॅग सुरक्षेसाठी दिल्या जाणाऱ्या आहेत.









