वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स एसयूव्ही गटामध्ये आपली नवी गाडी सादर करण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्स येत्या काळात आपली सुधारित सिएरा ही एसयुव्ही गाडी नव्याने बाजारात लॉन्च करणार आहे. याच महिन्यामध्ये 25 तारखेला कंपनी नव्या सिएराचे लॉन्चिंग करणार असून सदरची गाडी ही थार रॉक्स आणि एमजीच्या हेक्टर या दोन गाड्यांना टक्कर देणार आहे.
विविध बदल
नव्या सीएरामध्ये अनेक बदल केलेले आहेत. कारची समोरील बाजू खूपच आकर्षक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. कारमध्ये एलईडी हेड लॅम्प, एलईडी लाईट बार आणि एलईडी फॉग लॅम्पचा समावेश केलेला असून गाडीला स्पोर्टी लुक देण्यात आलेला आहे. यामध्ये ड्युअल टोन अॅलॉय व्हील असून रूफ रेल्स, शार्क फिन अँटीना, फ्लश फिटिंग डोर हँडल अशा सुविधा दिल्या गेलेल्या आहेत.
इतर सुविधा
गाडीच्या आतमध्ये पाहता को-पॅसेंजर क्रीन, इन्फोटेनमेंट टचक्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेला आहे. सोबत पॅनारोमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टिव्हिटी सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरच्या नव्या गाडीची किंमत ही अंदाजे 13.50 लाख रुपये ते 24 लाख रुपये या दरम्यान असू शकते, असेही सांगितले जात आहे.









