व्हायब्रंट गुजरात समिट 2024 मध्ये टाटाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची माहिती
गांधीनगर :
टाटा समूह गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर कारखाना उभारणार असल्याचे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी सांगितले. येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या 10 व्या आवृत्तीत बोलताना चंद्रशेखरन म्हणाले की, समूह दोन महिन्यांत साणंदमध्ये लिथियम-आयन बॅटरी तयार करण्यासाठी 20 जीडब्लू क्षमतेची गिगाफॅक्टरी सुरू करणार आहे. ते म्हणाले की, टाटा समूहाने एक ठराव केला जो पूर्ण होणार आहे. तसेच धोलेरा मध्ये ‘विशाल सेमीकंडक्टर फॅब’ची उभारणी होणार आहे.
लक्ष्मी मित्तल उभारणार सर्वात मोठा स्टील प्रकल्प
आर्सेलर मित्तल हाजीरा येथे जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारणार आहे. आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांनी बुधवारी सांगितले की कंपनी 2029 पर्यंत हजिरा, गुजरात येथे जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादन कारखाना उभारणार आहे. येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या कार्यक्रमात बोलताना मित्तल म्हणाले की, कारखान्याची क्षमता वाढणार असून ती दरवर्षी 24 दशलक्ष टन इतकी असेल. ते म्हणाले की, शिखर परिषदेत आर्सेलर मित्तलने गुजरात सरकारसोबत हजिरा प्लांटच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सामंजस्य करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये हजिरा प्लांटच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन केले होते.